Tue, Nov 20, 2018 01:10होमपेज › Kolhapur › जिंदाल टोळीवर लवकरच ‘मोक्‍का’खाली दोषारोपपत्र

जिंदाल टोळीवर लवकरच ‘मोक्‍का’खाली दोषारोपपत्र

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील गुन्हेगारी जिंदाल टोळीविरोधात मोक्‍का कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलिस महासंचालक बिपिन बिहारी यांनी मंजुरी दिली. टोळीचा प्रमुख किशोर सुरेश जैंद ऊर्फ जिंदाल (वय 45), शाहरूख आरिफ सुतार (28), सूरज अब्दुल शेख (24), केशव संजय कदम (23, सर्व रा. खोतवाडी, शहापूर, इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत. या सर्वांविरोधात पुणे मोक्‍का न्यायालयात भक्‍कम पुराव्यांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक विनायक नरळे यांनी सांगितले.

इचलकरंजीतील शहापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात विनायक राजेंद्र माने यांच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच या गुन्हेगारी टोळीने इचलकरंजी, हातकणंगलेसह आसपासच्या जिल्ह्यात जिंदाल टोळीच्या नावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

जिंदाल टोळी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवत आहे. तसेच यासाठी धमकी, हाणामारीसह बेकायदेशीर कृत्ये करत असल्याचे तपासात पुढे आले.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक झाडे यांनी तपास पूर्ण केला.