Fri, Apr 19, 2019 12:36होमपेज › Kolhapur › स्वराज्य संकल्पक जिजाऊंना आज अभिवादन

स्वराज्य संकल्पक जिजाऊंना आज अभिवादन

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जुल्मी, अत्याचारी, परकीय सत्ताधिशांच्या जोखडात शेकडो वर्षे खितपत पडलेल्या महाराष्ट्रासह मराठी मनाला स्वातंत्र्यांची स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे अतुलनीय कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले. किंबहुना रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्मितीची संकल्पनाच जिजाऊंची होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत इतिहासाला कलाटणी देण्याचे कार्य शिवछत्रपतींकडून जिजाऊंनी करवून घेतले.  राष्ट्रनिर्मितीच्या व्यापक भावनेने केलेले हे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. अशा या राष्ट्रमाता जिजाऊंचा मृत्यू 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गढीमध्ये झाला. गढीपासून काही अंतरावरच त्यांची समाधी बांधण्यात आली. 

जिजाऊंनी दिलेल्या स्वराज्याच्या कानमंत्रानुसार शिवछत्रपतींनी रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करून व्यापक राष्ट्रभावना महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासीयांच्या मनात चेतविली. शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या सीमा मर्यादित होत्या. पण स्वातंत्र्याच्या विचाराने संपूर्ण देशवासीयांच्यात नवी उमेद  निर्माण केली. अनेक शतके पिचलेल्या माणसांत स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. सहकार्‍यांच्या मदतीने शिवछत्रपतींनी संपूर्ण जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे अतुलनीय कार्य केले. रविवारी दि. 17 रोजी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध संस्था-संघटनांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केएमसी कॉलेजच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.