Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Kolhapur › जीप-दुचाकी धडकेत बालक ठार

जीप-दुचाकी धडकेत बालक ठार

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:52AMपोर्ले तर्फ ठाणे : वार्ताहर

जीप आणि दुचाकी यांच्या धडकेत पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दहा वर्षांचा मुलगा ठार झाला, तर दोघे किरकोळ जखमी झाले. वरुण सुरेश उबाळे (वय 10, रा. पोर्ले) असे ठार झालेल्या मुलाचे नाव असून, सागर रंगराव खोत व सविता सुरेश उबाळे जखमी आहेत. माजगाव फाटा येथे बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला.

उतरे (ता. पन्हाळा) येथील प्रकाश पाटील हे नवीन बोलेरो जीप (एमएच 09-ईक्यू 9779) खोतवाडी-माजगाव येथून पूजन करून गावाकडे जात होते. माजगाव फाटा येथे वळण घेत असताना माळवाडी येथून पोर्लेकडे सागर खोत हे बहीण सविता उबाळे व भाचा वरुण यांच्यासह दुचाकीवरून येत होते. जीप वळण घेत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे जीपने दुचाकीला जोराची धडक दिली. यात सागर खोत व वरुण उबाळे जखमी झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप रस्त्याकडेला असणार्‍या उसाच्या शेतात जाऊन अडकली. जखमींना तत्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना वरुणचा रात्री मृत्यू झाला. वरुण पाचवीमध्ये शिकत होता. त्याच्या मागे आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.