होमपेज › Kolhapur › बालिकेच्या अपघाती मृत्यूनंतर जयसिंगपूरमध्ये तणाव

बालिकेच्या अपघाती मृत्यूनंतर जयसिंगपूरमध्ये तणाव

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:11AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

सांगली - कोल्हापूर महामार्गावरील  नांदणी रोडवर उदगाव बँकेसमोर तेलवाहू टँकर आणि स्प्लेंडर मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिका जागीच ठार झाली. या अपघातानंतर संतप्त जमावाने टँकरवर जोरदार दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. जमावाकडून जयसिंगपूर पोलिसांच्या जीपवरही हल्ला झाला. दगडफेकीत जीपची काच फुटली. रात्री पावणेेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संस्कृती अभिजित कांबळे (रा. 52 झोपडपट्टी) असे ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.तिचे वडील जखमी झाले. बालिकेच्या मृत्यूनंतर तिच्या आईने आणि आजीने घटनास्थळी हंबरडा फोडला.

याबाबत अधिक माहिती अशी, टँकर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. तर बालिका आपल्या वडिलांसमवेत मोटारसायकलवरून घराकडे जात होती. शहरातील उदगाव बँकेजवळ महामार्ग ओलांडत असताना टँकर व मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात बालिका जागीच ठार झाली. दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने टँकरवर दगडफेक केली. तसेच टँकरमधील ऑईलचे व्हॉल्व्ह सोडून तो पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतप्त जमावाला पोलिसांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अखेर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सई भोरे - पाटील, विनायक नरळे, सांगली येथील गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक किरण दीडवाघ, शिरोळचे कुबेर गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जादा कुमक बोलविण्यात आली.  संतप्त जमावाने जयसिंगपूर पोलिसांच्या जीपवर हल्ला करीत समोरील काच फोडली.पोलिसांनी जमावाला पांगवून रस्त्यावरील बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी बालिकेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. पोलिसांनी जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकास पाचरण करून रस्त्यावर सांडलेले ऑईल धुवून काढले. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.