होमपेज › Kolhapur › जैनापुरात वधूकडील जीपची हुल्लडबाजांकडून तोडफोड

जैनापुरात वधूकडील जीपची हुल्लडबाजांकडून तोडफोड

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:45AM

बुकमार्क करा
 जयसिंगपूर : प्रतिनिधी

जैनापूर (ता. शिरोळ) येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रॅक्स क्रुझरवर मोटारसायकलस्वार येऊन आदळला. गावातील हा मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला; मात्र झाले उलटे, ट्रॅक्सनेच धडक दिल्याच्या गैरसमजूतीतून हल्ला करून हुल्लडबाजांनी ट्रॅक्सची समोरची काच फोडून साऊंड सिस्टीम व कागदपत्रे पळविली. हे प्रकरण जयसिंगपूर पोलिस ठाण्यापर्यंत आले; मात्र रात्री उशिरापर्यंत प्रकरणाची डायरीत नोंद झाली नव्हती.

कर्नाटकातील मायाक्का-चिंचलीहून (ता. रायबाग) विवाहानिमित्त वधूकडील पाहुणे ट्रॅक्स क्रुझरने जैनापूरला आले होते. रस्त्याकडेला ट्रॅक्स क्रुझर उभी होती. रात्री दहा वाजता हीरो एचएफ डिलक्सवरील मोटारसायकलस्वार भरधाव येऊन या ट्रॅक्सवर आदळला. त्यामुळे वधूकडील मंडळींसमोर मोठा बाका प्रसंग उभा राहिला. काही कारण नसताना हुल्लडबाजांनी केलेल्या दगडफेकीत ट्रॅक्सचे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले. काचा फोडून साऊंड सिस्टीम हुल्लडबाजांनी पळविली. जखमी व वराकडील मंडळी दूरच राहिली; मात्र हुल्लडबाजांनी डाव साधला. काचा लागून ट्रॅक्सचा चालक किरकोळ जखमी झाला. मंगळवारी सकाळी जखमीचे नातेवाईक आणि कर्नाटकातील पाहुणे मंडळी यांनी पोलिस स्टेशन गाठले. पोलिस ठाण्याबाहेर दिवसभर चर्चेच्या फेर्‍या रंगल्या. अखेर दोन्ही बाजूंकडील मंडळींत समझोता होऊन झालेल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचे ठरले. पोलिसांनीही रात्री उशिरा कोणतीही नोंद नसल्याची माहिती दिली.