Wed, May 22, 2019 17:18होमपेज › Kolhapur › एका मिठीची गोष्ट रुढीत रुतलेलं स्वत्व सॉरी एकांकिका ठरल्या लक्षवेधी

एका मिठीची गोष्ट रुढीत रुतलेलं स्वत्व सॉरी एकांकिका ठरल्या लक्षवेधी

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 19 2018 10:13PMजयसिंगपूर: प्रतिनिधी

येथे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत तिसरा दिवस ‘सॉरी’ व ‘एका मिठीची गोष्ट’ने गाजवला. ‘रुढीत रुतलेलं स्वत्व’ यामध्ये रुढी,परंपरेत होरपळलेली स्त्री, ती मांडू आणि भांडू पाहतेय; पण ऐकणारं कुणीच नाही हा एकांकिकेचा कथासार सर्वोत्कृष्ट ठरला.  वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणारी ‘एका मिठीची गोष्ट’ या एकांकिकेने प्रेक्षकांना गुंतवून ठेवले. मिठीकडे बघणारा द‍ृष्टीकोन त्या मिठीचा अर्थ सांगतो. स्वामी नाट्यांगण डोंबिवलीच्या कलाकारांचा अभिनय उत्तम तसेच नेपथ्यही सरस होते.

चुका मुलांनी केल्या तरी प्रत्येक वेळी पालकांना सॉरी म्हणावे लागते हा लेखक संदीप दंडवते यांच्या ‘सॉरी’ एकांकिकेचा विषय होता. संदीप दंडवते यांच्यातील दिग्दर्शक व बाप लाजबाब ठरला. रंगयात्रा नाट्य संस्था इचलकरंजी यांच्या ‘अफू’ या एकांकिकेने झाली. दिग्दर्शन अनिरुद्ध दांडेकर यांचे होते. पार्श्‍वसंगीत, नेपथ्य लक्षात राहण्यासारखे होते. यातील गोबर (आशिष भागवत) व फकिरा (आशिष कुलकर्णी) हे दोन्ही पात्र उठावदार ठरले.

‘मृत्युचक्र’एकांकिकेने नक्षलवादी चळवळ आणि त्यामुळे समाजात पसरणारा दहशतवाद याचा खेळ दाखविला. रंगभूमी ग्रुप बेळगावच्या कलाकरांचा अभिनस सहजसुंदर होता. चिन्मय शेंडे (अन्वय) यांचा अभिनय सहज होता.  लेखन व दिग्दर्शन मेघा मराठे यांचे होते. स्पर्धेतील तिसरी एकांकिका लक्षवेधी ठरली ती पूनम कुलकर्णी यांच्या  ‘रुढीत रुतलेलं स्वत्व’ या एकांकिकेतील माणसा या भूमिकेमुळे. सुबक नेपथ्य व प्रकाश योजना आकर्षक होती. आदिम काळातील स्त्री.. लादलेल्या रुढी परंपरा मिरवणारी स्त्री, या प्रश्‍नांनी होरपळलेली स्त्री, आतल्या आत-सगळे साचलेले ती मांडू आणि भांडू पाहतेय; पण ऐकणारं कुणीच नाही. असा एकांकिकेचा कथासार, पूनम कुलकर्णी यांचे पाठांतर, अभिनय 
सर्वोत्कृष्ट होता.

निसर्गमित्र प्रतिष्ठान इचलकरंजी यांची उदय गोडबोले लिखित ‘चार की चाळीस,’ आरंभ कलाविष्कार, मुंबई यांची ‘डंपिंग टूगेदर’ ही एकांकिका झाली. माणसाचे दोन स्वभाव - पॅक्टिकल आणि इमोशनलपणा या दोन्ही स्वभावांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला. कलाकारांचा अभिनय चांगला ठरला.‘समर्थ’ सातारा यांची ‘कथा बेवारस मुडद्याची’  गावाच्या वेशीवर एक बेवारस मुडदा आढळून येतो. त्या बेवारस मुडद्यापासून फायद्यासाठी दोन्ही गावचे नेते व गावकरी भांडतात. नंतर फायद्यासाठी नेते एकत्र येतात.

व त्या मुडद्यापासून काहीच फायदा नाही हे लक्षात येताच ज्याच्याकडून फायदा आहे त्याचा नव्याने खून करतात हा कथासार. यातील ‘गवत्या’ दारूडा लक्षवेधी ठरला. नेपथ्य सुंदर होते. अभिनय उत्तम. पार्श्‍वसंगीत व प्रकाशयोजना सुबक. स्पर्धेत ही एकांकिका लक्षवेधी ठरली ‘आम्ही रसिक’ आणि जयसिंगपूर नगरपरिषद शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती आयोजित आणि दानचंदजी घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर प्रायोजित स्पर्धा पार पडल्या.