जयसिंगपूर : प्रतिनिधी
उमळवाड येथे दानलिंग स्वामी महाराज यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पै. बाळू पुजारी-कोथळी दानलिंग केसरीचा मानकरी ठरला. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. पुजारी व क्रांती कुंडल कारखान्याचा पै. अक्षय कदम यांच्यात झाली. दोघांची लढत 40 मिनिटे सुरू होती. गुणावर बाळू पुजारीला विजयी घोषित करण्यात आले. पै. पुजारी याला चांदीची गदा, रोख रक्कम व मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले. मैदानात महिलांच्या कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या. सांगली येथील पै. सई जाधवने शांतिनिकेतन आखाड्याची पै. मयुरी शिंदेला चितपट केले.
उमळवाड येथे महाशिवरात्रीला प्रतिवर्षी दानलिंग स्वामी महाराजांची यात्रा भरते. 11 व्या शतकातील येथे पुरातन मंदिर आहे. महाराजांनी येथे संजीवनी समाधी घेतली. त्यांचे पूर्ण नाव दानलिंग नागेश पोतदार असे होते; मात्र भाविक दानलिंग स्वामी या नावानेच त्यांना संबोधतात. हे मंदिर सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. सांगली तालीमचा पै. शिवा तांबवे-भोसले व पै. सुशांत जाधव यांच्यात दुसर्या क्रमांकाची कुस्ती झाली.
यात सुशांत जाधवने भोसलेला चितपट केले. तिसर्या क्रमांकाच्या लढतीत कवठेपिरान येथील पै. प्रवीण साळुखे व इचलकरंजीचा पै.श्रीअंत भोसले यांच्यातील लढत बरोबरीत सोडविण्यात आली. मैदानात या मोठ्या कुस्त्यासह 50 वर चटकदार लहान-मोठ्या लढती झाल्या. तसेच महिलांच्या 10 कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या. यावेळी मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तम पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन पै. विनोद देसाई, सागर चिपरगे, पोलिस अधीक्षक पडळकर, सुनील देबाजे यांच्या उपस्थितीत पुजारीसह पैलवानांना गौरविण्यात आले.