Sun, Jul 21, 2019 06:27होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेची सैनिकांसाठी ‘जय जवान गृह कर्ज’ योजना

जिल्हा बँकेची सैनिकांसाठी ‘जय जवान गृह कर्ज’ योजना

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी, ‘जय जवान गृह कर्ज’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमध्ये सैनिकांसाठी खास बाब म्हणून व्याजात अर्धा टक्का सुट देण्यात येणार आहे. 

यासंदर्भात सामाजिक बांधिलकीचा विचार करून जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेच्या दि. 22 जानेवारी रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. या कर्जाची कमाल मर्यादा 25 लाख असून जवानांची पत्नीही नोकरदार असल्यास दोघांचे उत्पन्न विचारात घेऊन संयुक्त मागणीचा विचार केला जाणार आहे. कर्ज फेडीचा कालावधी जास्तीत जास्त 15 वर्षांचा असून मासिक हप्त्याचा परतफेडीवर 11 टक्के व्याजदर आहे.

या योजनेंतर्गत सैनिकांना जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरही घर बांधणी, फ्लॅट खरेदी, गाळा खरेदी व घर खरेदीसाठी कर्ज मिळणार आहे. यापूर्वी बँकेने शेती कर्ज पुरवठ्याबरोबर बिगर शेती व व्यक्तिगत कर्ज पुरवठाही मोठ्या प्रमाणात केला आहे. तसेच बँकेत ज्यांचे पगार जमा होतात, अशा कर्मचार्‍यांसाठी पगारावर ओ डी व पेन्शनधारकांना  मध्यम मुदत, वाहन कर्ज, गृहकर्ज त्याचबरोबर संगणकासह गृह उपयोगी वस्तूसाठी कर्जपुरवठा सुरू केला आहे.