Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दूध संकलन ठप्प

जिल्ह्यात दूध संकलन ठप्प

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 16 2018 10:29PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावोगावी दूध संकलन बंद होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रॅली काढून दूध दरवाढ आंदोलनाबाबत जनजागृती केली. 

शाहूवाडी तालुक्यात टँकर फोडला

सरूड : वार्ताहर

दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या बेमुदत दूध बंद आंदोलनामुळे शाहूवाडी तालुक्यात दैनंदिन सुमारे सव्वा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले. तालुक्यातील एकाही दूध संस्थेत दुधाचे संकलन न झाल्याने या आंदोलनास तालुक्यात पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, रविवारी मध्यरात्री पोलिस बंदोबस्तामध्ये दूध वाहतूक करणार्‍या एका टँकरवर डोणोलीच्या हद्दीत दगडफेक करून टँकरची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत पोलिस बंदोबस्तात हा टँकर कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण केला तर सोमवारी सांयकाळी सहाच्या सुमारास रत्नागिरीकडे दूध पॅकिंगच्या पिशव्या घेऊन निघालेल्या भारत डेअरीच्या गाडीचीही अज्ञात दहा ते बारा व्यक्‍तींकडून भाडळे खिंडीनजिक तोडफोड करून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून या गाडीतील दुग्धजन्य पदार्थांची नासधूस केली. या दोन्ही घटनांमुळे शाहूवाडी तालुक्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

दूध बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दिवसभर स्वाभिमानीच्या तालुक्यातील कार्यकर्ते  दूध वाहतूक रोखण्याच्या उद्देशाने बांबवडे परिसरात ठाण मांडून बसले होते. दूध संकलन ठप्प झाल्याने काही दूध उत्पादकांनी आपले दूध हॉटेल व्यावसायिकांना दिले. तर काही दूध उत्पादकांनी दुधाचे वाटप केले.साळशी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातील महादेव मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीसाठी साकडे घातले.

जयसिंगपुरात दुधाची वाहने अडवली

जयसिंगपूर/शिरोळ : प्रतिनिधी

दुधाला प्रतिलिटर 5 रुपये थेट अनुदान मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला आज शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व दूध संस्था यात सहभागी होत्या. दूध संकलन  ठप्प राहिले. यळगूड दुधाची गाडी जयसिंगपुरात अडविण्यात आली. गावागावांतील देवदेवतांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला. अतिरिक्‍त दुधाचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाटप केले. पोलिसांनी दक्षता म्हणून शहर व परिसरातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा लागू केल्या आहेत.

जयसिंगपुरात यळगूड सहकार संघाची गाडी अडवून 250 लिटर दुधाच्या पिशव्या शाहूनगर व रेल्वेस्टेशन रोडवर वाटल्या. राजीव गांधीनगरातील 6 ते 8 व्या गल्लीत, अवचित नगर, झोपडपट्टी, अंगणवाडी शाळेतही अतिरिक्‍त सुमारे 1500 लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. जयसिंगपूर ग्रामदैवत सिद्धेश्‍वर व शिरोळचे ग्रामदैवत बुवाफन महाराज यांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला. खिद्रापूर कोपेश्‍वर मंदिरातही दुग्धाभिषेक घालण्यात आला.

सिध्देश्‍वर मंदिरात डॉ. महावीर अक्‍कोळे, पै. विठ्ठल मोरे, शैलेश आडके, शंकर नाळे, अमित सांगले, संजय मादनाईक, शिंगाडे यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक घातला. मंदिरातील अन्य देवांनाही अभिषेक घालण्यात आला.स्टेशन रोडवर यळगूड गाडी अडविण्यात आली. चालकाने बेकरी माल असल्याचे सांगितले. मात्र बेकरी मालामध्ये कार्यकर्त्यांना 250 लिटर दुधाच्या पिशव्या आढळल्या. त्या बाहेर काढून रस्त्यावर गरजूंना वाटप करण्यात आले. शिरढोण येथे सकाळी गवळ्याकडून तीन कॅनमधील सुमारे 80 लिटर दुधाचे विक्रीसाठी होणारा प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडले. सर्व दूध जप्त करून ते वाटप करण्यात आले. 

दूध संकलन केंद्र व परिसरात पोलिस बंदोबस्त

शिरोळ : दूध संकलन बंद आंदोलनास सोमवारी पहिल्या दिवशी शेतकर्‍यांसह दूध उत्पादकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्यामुळे शिरोळसह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात दूध संकलन व विक्री ठप्प झाली. दरम्यान, पोलिस प्रशासनाने दूध संकलन केंद्र व परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळपर्यंत शांततेत दूध बंद आंदोलन झाले.

शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी रात्री सव्वाबारा वाजता येथील श्री बुवाफन महाराज समाधीस दुधाचा अभिषेक घालून आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून शिरोळ पोलीसांनी सन 2012 च्या उस दर आंदोलनातील 30 कार्यकर्त्यांना कलम 149 आणि 144 च्या नोटिसा बजावून सनदशीर मार्गाने आंदोलन करावे. आंदोलनास हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. 

दुग्धाभिषेक करून आंदोलनाला सुरुवात

कुरूंदवाड : प्रतिनिधी

येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व ग्रामदैवत मारुती मंदिरातील मूर्तीला मध्यरात्री दुग्धाभिषेक घालून दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, आज दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गायीचे दूध संकलन करून ते दूध वारकरी व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

दानोळीत हनुमान मूर्तीला दुधाचा अभिषेक

दानोळी : वार्ताहर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला येथील हनुमान मंदिरातील मूर्तीला बारा वाजता दुग्धाभिषेक करून  दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली. दानोळीसह परिसरातील कोथळी, कवठेसार, उमळवाड, चिपरी, निमशिरगाव  आदी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

दबाव टाकण्याचा प्रयत्न

शिरोळ शहरात दररोज सुमारे पाच हजार लिटर दुधाचे संकलन होते. खा. शेट्टी यांच्या दूध दर वाढ आंदोलनास पाठिंबा देत दूध उत्पादक शेतकर्‍यांनी स्वतःहून दूध संस्था अथवा दूध व्यवसायिकांना दूध विक्री केली नाही. दूध संघ जबरदस्तीने दूध संकलन करण्याबाबत शेतकर्‍यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होते; पण स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार हाणून पाडला, याला सचिन शिंदे यांनी दुजोरा दिला.