Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Kolhapur › शासनाच्या निषेधार्थ शेतकर्‍यांचे जेलभरो आंदोलन

शासनाच्या निषेधार्थ शेतकर्‍यांचे जेलभरो आंदोलन

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करावी, दूध दरवाढ करण्याचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी न करणार्‍या शासनाचा धिक्‍कार असो, अशा घोषणा देत राज्य शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेे. 

आंदोलकांनी बैलगाडीतून सविनय कायदेभंग केल्याचे फॉर्म भरून ते जिल्हाधिकार्‍यांना देण्यासाठी आणले होते. हे फार्म बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जात असताना पोलिसांनी ही गाडी गेटवर अडवली. त्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये फसवणूक केल्याच्या निषेधार्थ व दूध दरवाढ करूनही त्याची अंमलबजावणी केली नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना सुकाणू समितीच्यावतीने राज्यभर सोमवारी जेलभरो आंदोलन जाहीर करण्यात आले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी समितीचे कार्यकर्ते महावीर गार्डन येथे जमा झाले. आंदोलकांनी दिलेले दहा हजारांवरील निवेदनांचे फॉर्म बैलगाडीत ठेवले. तेथून मोर्चाने हे फॉर्म जिल्हाधिक़ार्‍यांना देण्यात येणार होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर पोलिसांनी गेटवर ही बैलगाडी अडविण्यात आली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

नामदेवराव गावडे म्हणाले, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी शासनाने पाकिस्तानातून साखर आयात करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. दूध दराबाबत दूध संघाना दूध पावडर करण्यासाठी तीन रुपये प्रतिलिटर अनुदान दिले आहे. त्याचा प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कोणताही फायदा होणार नाही. सध्या आधारभूत किमतीमध्ये शेतकर्‍यांची लूट होत आहे. 

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, पाकिस्तानातून साखर आयात करून शासनाने शेतकर्‍यांचे अन्‍नात विष कालवण्याचे काम केले आहे. पण देशाचा इतिहास हा स्वाभिमानाचा इतिहास आहे. हे संघवाले हा इतिहास पुसण्याचे काम करत आहेत. शेतकर्‍याला एफआरपी मिळत नाही. दूध दर जाहीर केला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही, अशा प्रकारे शेतकर्‍यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यासाठी शासनाने सरसकट कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

साथी वसंतराव पाटील यांनी यापुढे शेतकरी स्वत:ला त्रास करून घेणार नाहीत. आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणणार्‍या सरकारला व त्यांच्या मंत्र्यांनाच आत्महत्या करण्याची वेळ आणू. या आंदोलनात बाबासो देवकर, केरबा पाटील, रघुनाथ कांबळे, नामदेव पाटील, दिनकर सूर्यवंशी, बाबूराव कदम बाबासो रानगे, एकनाथ पाटील आदींचा समावेश होता.