Sun, Feb 23, 2020 10:47होमपेज › Kolhapur › गूळ दरात सांगलीच ‘चांगली’

गूळ दरात सांगलीच ‘चांगली’

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 10 2018 11:05PMकोल्हापूर : संग्राम घुणके

कोल्हापूरचा गूळ जगात भारी असला तरी दरात मात्र कोल्हापूर बाजारपेठेपेक्षा सांगली भारी ठरत असल्याचे बाजारपेठेत चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर बाजार समितीपेक्षा सांगली बाजार समितीत गुळाला प्रतिक्िंवटल 378 रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीमधील दराचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात गूळ दराची कमालीची घट झाली असून गूळ उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

चव, रवाळपणा, कठीणपणा या तीन पातळीवर कोल्हापूरचा गूळ सर्वात चांगला ठरतो. मात्र, इतरत्र उत्पादित होणारा गूळ कोल्हापुरी नावाने विकला जाणे, गुळात होत असलेला साखरेचा वापर आणि सातत्याने होत असलेली दरातील घट यामुळे बाजार समितीमधील गुळाच्या उलाढालीत कमालीची घट होत आहे; पण सांगली बाजार समितीत मिळणारा चांगला दर यामुळे तेथील गुळाची उलाढाल वेगाने वाढली आहे. वार्षिक 400 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा टप्पा सांगली बाजारपेठेने पार केला आहे. कोल्हापुरात आक्टोबरपर्यंत गुळाला सरासरी 3 हजार 600 रुपये 3 हजार 700 रुपये असा सरासरी दर होता. डिसेंबर महिन्यापासून दरात घसरण सुरू आहे ती अद्याप थांबलेली नाही. या हंगामात कोल्हापुरात कमीत कमी 2 हजार 700 रुपये ते  6 हजार रुपयांपर्यंत दर राहिला. जानेवारी महिन्यातील सरासरी दर 3 हजार 300 रुपये असा राहिला.

सांगली बाजार समितीत सध्या 3 हजार 161 इतका किमान व 4 हजार 198 रुपये प्रतिक्िंवटल असा दर राहिला आहे. यामुळे दराची सरासरी 3 हजार 678 रुपये अशी राहिली आहे. गत महिन्यापासून 378 रुपये ज्यादा दर प्रतिक्विटंलला मिळत आहे. शाहूवाडी तालुक्यातील गूळ उत्पादक कराड बाजारपेठेकडे वळत आहेत.  

कोल्हापूर बाजार समितीत 2012-13 सालात 270 कोटी रुपये उलाढाल झाली होती. 2016-17 सालात 219 कोटी रुपये झाली. म्हणजे गतवर्षी 2012-13 च्या तुलनेत उलाढालीत 50 कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.