Wed, Apr 24, 2019 01:35होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर

मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात जागर

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:14AMकोल्हापूर :  प्रतिनिधी 

शहर आणि जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून बंदचे आवाहन करत दसरा चौकाकडे येणारे तरुणांचे जथ्थेच्या-जथ्थे, हातात भगवे ध्वज, डोक्यावर टोपी घातलेल्या तरुण मावळ्यांकडून दिल्या जाणार्‍या घोषणा आणि रणहलगी व घुमक्याच्या कडकडाटाबरोबरच शाहिरांच्या डफाची साथ अशा स्फूर्तिदायी वातावरणात ऐतिहासिक दसरा चौकात आज पुन्हा एकदा मराठ्यांचे भगवे वादळ अवतरले. निमित्त होते...ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्ताने दसरा चौकात आयोजित ध्वजवंदन आणि मराठा आरक्षण सभेचे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने गेली पंधरा दिवस सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद आणि आरक्षण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूर जिल्ह्याने उत्स्फूर्त पाठबळ देत कडकडीत बंद केला. 

सकाळी 9 वाजल्यापासूनच गावागावांतून आणि शहरातील पेठापेठांतच आंदोलनाची तयारी सुरू होती. उपनगर व ग्रामीण भागातून मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर या रॅली दसरा चौकाच्या दिशेने रवाना झाल्या. दसरा चौकात चोहोबाजूंनी डोक्यावर ‘एक मराठा-लाख मराठा’ असे लिहिलेली भगवी टोपी, हातात शिवछत्रपतींचे चित्र असणारा भगवा ध्वज आणि मराठा आरक्षणाच्या घोषणा देत अबालवृद्धांसह महिला-तरुण येऊ लागले. बघता बघता दसरा चौकाकडे जाणारे चारही रस्ते मराठा आंदोलकांनी फुलून गेले.

दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती भव्य ‘विचारपीठ’ उभारण्यात आले होते. या विचारपीठावरून शिवशाहिरांचे डफ कडाडले. त्या जोडीला अधूनमधून घुमणारा हलगी-घुमक्याचा कडकडाट आणि त्यावर भिरभिरणार्‍या तलवारी, लाठी आणि पट्ट्यांच्या मर्दानी खेळांनी वातावरणात वेगळाच रंग भरला. अधूनमधून ‘एक मराठा, लाख मराठा...’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, नाही कुणाच्या बापाचं...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षण मागणीसाठी होत असलेला विलंब, बहुजन समाजाबाबतच्या सरकारच्या धोरणाबाबत  जमलेल्या आंदोलकांकडून उत्स्फूर्त भाषणांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या. सायंकाळी ध्वज उतरेपर्यंत मराठा आंदोलकांचे भगवे वादळ दसरा चौकात घोंगावत होते.