Tue, Jun 18, 2019 22:35होमपेज › Kolhapur › बिलाची फाईल न दिल्याने कंत्राटदाराची जिल्हा परिषद कर्मचार्‍याला मारहाण.

बिलाची फाईल न दिल्याने कंत्राटदाराची जिल्हा परिषद कर्मचार्‍याला मारहाण.

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बिलाची फाईल देण्यावरून कंत्राटदाराने जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकाला शिवीगाळ करून कानशिलात लगावून रक्‍तबंबाळ केल्याचा धक्‍कादायक प्रकार गुरुवारी दुपारी घडला. पाणी व स्वच्छता विभागात घडलेल्या या प्रकारानंतर सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद करत मुख्यालयासमोर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंंदवला. अध्यक्ष शौमिका महाडिक व सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंबंधी फौजदारी व प्रशासकीय कारवाई करू, अशी ग्वाही दिल्यानंतर कर्मचारी कामावर परतले. 

या घटनेचे पडसाद जि. प सर्वसाधारण सभेतही उमटले. तेथे या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून सर्व कामे रद्द करण्याचाही ठराव झाला. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा सुरू असतानाच दुपारी सव्वातीनच्या सुमारास कागलकर हाऊस या जि.प.च्या जुन्या इमारतीतील पाणी व स्वच्छता विभागात मारहाणीचा प्रकार घडला. करवीर पंचायत समितीत वरिष्ठ सहायक असलेले आणि सध्या पाणी व
 स्वच्छता विभागात प्रतिनियुक्‍तीवर आलेले युनूस देसाई यांच्याशी फाईल देण्यावरून भुदरगडचा  कंत्राटदार संजय निकाडे याने हुज्जत घातली.

निकाडे याने अरेरावी करत फाईलची मागणी केली, यावर ती देता येणार नसल्याचे देसाई यांनी सांगितले. यावर, ‘तुझा बाप आणून देईल,’ अशा भाषेत निकाडे याने धमकावण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत निकाडे याने तोंडावर मारून रक्‍तबंबाळ केले. डाव्या खांद्यावर व मांडीवर मारहाण केली. यावेळी देसाई यांच्यासोबत असलेले अमर पाटील, विनोद घाटगे, तेजस मोरे, राम पाटील यांनी अडवण्याचा प्रयत्न केला; पण निकाडे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. या प्रकाराने कार्यालयात एकच गोंंधळ उडाला. तातडीने मुख्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. 

दरम्यान, हा गोंधळ सुरू असतानाच बाजूच्या शाहू सभागृहात सर्वसाधारण सभा असल्याने मारहाण झालेल्या देसाई यांनी सीईओंच्या नावे तक्रार अर्ज लिहून आपली कैफियत मांडली. याची तातडीने सभागृहानेही दखल घेत अशाप्रकारची अरेरावी खपवून घेणार नाही, मारहाण करणार्‍या कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्याचा ठराव मंजूर केला. सभागृहात सभा सुरू असताना सर्व कर्मचारी संघटनांनी मुख्यालयासमोर निषेध सभा घेतली. या सभेत कंत्राटदारांची दादागिरी खपवून घेणार नाही, अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करा, अशी मागणी करत कंत्राटदारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. 

कंत्राटदार निकाडेवर गुन्हा दाखल

जि.प मध्ये कार्यालयात मारहाण केल्यानंतर कंत्राटदार निकाडे हा स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी मारहाण झालेले युनूस देसाई यांनीही कर्मचारी संघटनांसमवेत शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन निकाडे यांच्याविरोधात फिर्याद दिली. यात निकाडे याने केलेल्या मारहाणीचा वृत्तांत कथन केल्यानंतर पोलिस ठाण्यात त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. सरकारी कर्मचार्‍याला धमकावून कामकाजात अडथळा आणल्याबद्दल 332, 333 व 353 अशी कलमे लावण्यात आली आहेत. 

कंत्राटदारांना आवरा

सध्या मार्च एंडिंगची कामे सुरू असल्याने बिले काढण्यासाठीची धावपळ उडाली आहे. यावरून कंत्राटदार व कर्मचार्‍यांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडत आहेत; पण गुरुवारी घडलेल्या प्रकाराने यावर कळस चढवला. निषेध सभेत सीईओ व अध्यक्षांसमोर बोलताना महिला कर्मचार्‍यांनी सफाई कंत्राटदारही अशाचप्रकारे बिले काढण्यासाठी दारू पिऊन येऊन कार्यालयात त्रास देत असल्याचे सांगितले. कंत्राटदार बिलांसाठी दबाव टाकत आहेत, आम्ही कामे कशी करायची, असा सवाल करत या कंत्राटदारांना आवरा, अशी विनंती कर्मचार्‍यांनी केली. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, resolved, put the, contractor, in black list,  cancel all the works