इचलकरंजी : रेशन वितरणासाठी अवघे तीन तास

Last Updated: Apr 01 2020 6:18PM
Responsive image


इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनमधून रेशन वितरणाला मुभा दिली आहे. असे असताना इचलकरंजीत सुरू असलेल्या शंभर टक्के लॉकडाऊन काळात रेशन वितरणासाठी रविवारी अवघे तीन तास देण्यात आले आहेत. या काळात संपूर्ण शहरवासियांना रेशनचे वितरण कसे होणार, असा प्रश्न असून शासनाच्या निर्णयालाच इचलकरंजीत प्रशासनाकडून हरताळ फासण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे मोठे हाल होणार आहेत. 

अधिक वाचा : दिल्लीतील तबलिगी जमातीत गेलेल्या कोल्हापुरातील २१ जणांचा शोध लागला 

इचलकरंजीत आज (दि.१) झालेल्या बैठकीत शंभर टक्के लॉकडाऊनचा निर्णय १४ एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये सकाळी ६ ते ९ या वेळेतच दूध विक्रीसाठी परवानगी राहणार आहे. त्यानंतर दिवसभर किराणा माल, बेकरी व अन्य सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. मागील तीन दिवसांपासून शहरात शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. 

अधिक वाचा : कोरानाचा फटका; दीड एकरावरील कोबी पिकावर फिरवला ट्रॅक्‍टर 

आता पुन्हा हा लॉकडाऊन १४ तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. केवळ रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे. याच तीन तासांत रेशनचे वितरण सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इतर दिवशी रेशन वितरण बंद राहणार आहे. लॉकडाऊनमधून रेशन व्यवस्थेला सुट देण्यात आली आहे. असे असताना इचलकरंजीत रेशन वितरणाला परवानगी देण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे नागरिकांना एप्रिल महिन्याचे रेशन कसे मिळणार, असा प्रश्न आहे.

अधिक वाचा : कोल्हापूर : मुस्लिम बोर्डिंग लगतच्या खोलीवर पोलिसांचा छापा

सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेही धान्य कसे मिळणार असा प्रश्न आहे. तीन तासांच्या काळात रेशनसाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. शासनाने रास्त भाव दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन रेशन वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन रविवारी केवळ तीन तासांत कसे होणार, असा प्रश्न असून गोरगरिबांना धान्य न मिळाल्यास लॉकडाऊनच्या काळात त्यांचे हाल होणार आहेत. 

अधिक वाचा : कोरोना LIVE : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ६३७