होमपेज › Kolhapur › ३१ मेपर्यंत बँक खात्यात पैसे ठेवणे आवश्यक

३१ मेपर्यंत बँक खात्यात पैसे ठेवणे आवश्यक

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:55AMकोल्हापूर : विशेष प्रतिनिधी 

केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेसाठी विमा योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर नागरिकांना एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना आपले बँक खाते चालू असल्याची खात्री करून घ्यावी लागेल. तसेच या खात्यावर 31 मे पूर्वी 342 रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा अत्यंत माफक दरात शासनाने उपलब्ध करून दिलेले सुरक्षा कवच गमविण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. 

केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला 4 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरू केली आहे. जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 330 रुपये एवढा आहे, तर सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम 12 रुपये आहे. या दोन्ही विम्यांचा प्रीमियम 342 रुपये एवढा आहे. या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर 31 मेपर्यंत बँकेत 342 रुपये ठेवणे आवश्यक आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी जातो. मे महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात एवढा बॅलन्स नसेल तर तुमचा विमा रद्द होणार आहे. 

शासनाच्या या योजनेनुसार या दोन्ही विम्यांचे मे महिन्यामध्ये नूतनीकरण करावे लागते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 330 रुपये एवढा आहे. या योजनेचा 18 ते 50 वर्षांच्या नागरिकांना लाभ मिळतो. बँक खात्याच्या माध्यमातून या योजनेला लिंक केले जाते. या योजनेतून विमाधारक व्यक्‍तीला 55 वर्षांचे सुरक्षा कवच मिळते. मुदतीपूर्वी जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर वारसाला 2 लाख रुपयांपर्यंतचे सुरक्षा कवच मिळते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षांपर्यंतचे नागरिक घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता फक्‍त 12 रुपये असून हप्ता बँक खात्यामधून जातो. ही योजना घेताना कोणत्याही एका बँक खात्याला योजनेशी लिंक करावे लागते. या योजनेंतर्गत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाला किंवा विमाधारक अपंग झाला तर 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. या योजनेचा हप्ता जमा करून कधीही विमा घेता येतो, पण मे महिन्याच्या शेवटी बँक खात्यात आवश्यक तेवढा बॅलन्स नसेल तर मात्र हा विमा रद्द होतो. नागरिकांनी जर अद्यापही या योजनेंतर्गत नोंदणी केली नसेल तर त्यांना कोणत्याही बँकेत खाते उघडून या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. यासाठी विमा एजंट, सरकारी विमा कंपनी आणि अनेक खासगी विमा कंपन्याही या योजना विम्याचा लाभ नागरिकांना देऊ शकतात.