Sat, Jul 20, 2019 23:44होमपेज › Kolhapur › पाटबंधारेचे पाणी तोडले

पाटबंधारेचे पाणी तोडले

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सुमारे एक कोटी रुपये पाणी बिलाच्या थकबाकीपोटी महापालिकेने पाटबंधारे (जलसंपदा) विभागाचे सहा नळ कनेक्शन शनिवारी तोडले. यात पाटबंधारेच्या पंचगंगा व वारणा भवन या इमारतींचा समावेश आहे. अशाप्रकारे पाणीपट्टी थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाने 7 मार्चला महापालिकेचे शिंगणापूर उपसा केंद्र सील केल्याचा वचपा काढला असल्याची चर्चा कर्मचार्‍यांत सुरू होती. नळ कनेक्शन बंद केल्याने पाटबंधारे विभागातील इमारतीत पिण्याच्या पाण्यासह वापरासाठीच्या पाण्यासाठी पाटबंधारेतील अधिकारी, कर्मचार्‍यांची चांगलीच पंचाईत होणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई करूनही जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना त्याची माहिती नव्हती. पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी आमच्या विभागाने कारवाई केली नसल्याचे सांगितले.पाटबंधारे विभागाच्या पंचगंगा भवनकडे 35 लाख 61 हजार 397 व वारणा भवन या इमारतीकडे 61 लाख 93 हजार 977 अशी एकूण 97 लाख 55 हजार 374 रुपये पाणीपुरवठा विभागाची थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने जानेवारीमध्ये पाटबंधारे विभागाला नोटीस बजावण्यात आली होती. मुदत देऊनही थकबाकी न भरल्याने पाटबंधारे विभागाच्या दोन्ही इमारतींचे सहा नळ कनेक्शन बंद करण्यात आले. 

त्यामुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली. कोल्हापूर शहरवासीयांना पंचगंगा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. त्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने महापालिकेकडून पाणीपट्टी आकारण्यात येते. पाणीपट्टी आकारणी जास्त असल्याने महापालिकेने ती भरलेली नाही. त्यामुळे सुमारे 21 कोटींवर थकबाकी गेली आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाने काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पाण्याचा पुरवठा करणार्‍या शिंगणापूर उपसा केंद्राला सील करण्यात आले होते.

वास्तविक पाटबंधारे व महापालिका या दोन्हीही शासकीय संस्था असल्याने थकबाकीचा प्रश्‍न चर्चेने सोडविण्यासाठी महापालिका अधिकारी प्रयत्न करत होते. वादग्रस्त थकबाकीप्रकरणी चर्चा सुरू असतानाच पाटबंधारे विभागाने टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिंगणापूर उपसा केंद्राला सील केले. त्यानंतर महापालिकेच्या घरफाळा विभागानेही पाटबंधारेच्या इमारतींच्या सुमारे दीड कोटी घरफाळा थकबाकीपोटी नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसीला उत्तर देताना पाटबंधारे अधिकार्‍यांनी महापालिकेकडे असलेल्या थकबाकीतून ही रक्‍कम वसूल करण्याचे पत्र आयुक्‍तांना दिले आहे. त्यामुळे तूर्तास घरफाळा थकबाकीपोटी पाटबंधारे विभागाच्या इमारती सील होण्यापासून वाचल्या आहेत. 

URL :