Thu, Jan 17, 2019 19:01होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात वूडकटरची खरेदी

कोल्हापुरात वूडकटरची खरेदी

Published On: Mar 25 2018 12:37AM | Last Updated: Mar 25 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे तपास यंत्रणाच काय; पण खाडीवरील मच्छिमारांच्याही हाताला लागू नयेत, याची मुख्य संशयित व निलंबित पोलिस अधिकारी अभय कुरूंदकरसह अन्य साथीदारांनी कमालीची खबरदारी घेतली होती. पेटीच्या चारही कोपर्‍याला प्रत्येकी पाच किलोची चार अवजड वजने बांधून मृतदेह खाडीत फेकल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीत निष्पन्‍न झाले आहे.

बिद्रे यांच्या हत्येसह पुरावा नष्ट करण्यासाठी वापर झालेले साहित्य कोठून उपलब्ध झाले? कोणत्या दुकानातून खरेदी झाली? कोणामार्फत खरेदी करण्यात आली? याचाही नवी मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे.वूडकटर वगळता बॅट, पत्र्याची पेटी व पाच किलोची चार वजने भाईंदर येथील दोन दुकानांतून खरेदी केल्याचे निष्पन्‍न झाल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते. तर वूडकटर कोल्हापूर येथील एका हार्डवेअर दुकानातून विकत घेतल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

कोल्हापूर व भाईंदर येथील दुकान मालकांचे तपास पथकातील अधिकार्‍यांनी जबाब नोंदविले आहेत. दुकानदारांनीही संबंधित वस्तूंची विक्री केल्याची कबुली दिली आहे. विक्रेत्यांच्या नावाबाबत यंत्रणेने गोपनीयता पाळली आहे. प्रसंगी संबंधित विक्रेत्यांना खटल्यात साक्षीदार करण्याच्या वरिष्ठस्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते.मुख्य संशयित अभय कुरूंदकर, राजेश पाटील, महेश फळणीकरसह अन्य आरोपींचे सीडीआर संकलित करण्यात आले आहेत. घटना घडली त्या कालावधीत संशयितांचा वावर कोठे होता, अश्‍विनी बिद्रे यांचे या कालावधीतील लोकेशन याचे सीडीआरही तपास यंत्रणेकडे उपलब्ध झाले आहेत, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Investigations revealed, woodcutter, bought , hardware shop, Kolhapur.