होमपेज › Kolhapur › आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुप्ता यांचे रविवारी व्याख्यान

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुप्ता यांचे रविवारी व्याख्यान

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर्स डे’निमित्त रविवारी (दि. 1) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ‘सर्वांगीण आरोग्याची त्रिमिती’ या विषयावर ते सखोल मार्गदर्शन करणार असून, उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन शंका निरसन करणार आहेत. मार्केट यार्डातील श्री शाहू सांस्कृतिक भवनात सकाळी साडेदहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. दै. ‘पुढारी’ आरोग्य व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष आहे.

बायपासशिवाय हृदयरोग बरा होऊ शकतो, याच्यावर डॉ. गुप्ता यांचा गाढा अभ्यास आहे. इतकेच नव्हे, तर बायपास झालेल्या रुग्णांवर अनेकदा पुन्हा हीच शस्त्रक्रिया किंवा एन्जिओप्लास्टी करण्याची वेळ येते तीसुद्धा टाळण्याचे तंत्रज्ञान डॉ. गुप्ता यांनी विकसित केले आहे. त्यांनी आठ हजारांहून अधिक रुग्णांवर अशाप्रकारचे यशस्वी उपचार केले आहेत. आत्मा, शरीर आणि मन या त्रिसूत्रीवर आधारित मनुष्य संचलन करीत असतो. आत्म्याची आत्मिक ऊर्जा, शरीराची शारीरिक ऊर्जा आणि मनाची मानसिक ऊर्जा या तिन्ही गोष्टींचा योग्य समन्वय होतो तेव्हाच आपण स्वस्थ व तंदुरुस्त राहू शकतो. 
‘आजाराला प्रतिबंध आणि आरोग्याचे संवर्धन’ या विषयावर डॉ. गुप्ता कार्यरत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे ताणतणाव, रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अतिकोलेस्ट्रॉल, अर्धशिशी, बद्धकोष्ठता, पित्त, किडनी विकार, हृदयविकार अशा अनेक आजारांवर त्रिमिती पद्धतीने कशी मात करू शकेल, यावर डॉ. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत. वयानुरूप जीवनशैली, आहार आणि व्यायाम यावर डॉ. गुप्ता प्रकाश टाकणार आहेत. आजाराची सुरुवात होण्यापूर्वीच घ्यावयाची दक्षता या व्याख्यानमालेतून उलगडली जाणार आहे. ज्यांना रक्तदाबाची सुरुवात, तसेच हायर रिस्क फॅक्टर्स उदा., लठ्ठपणा, स्ट्राँग फॅमिली हिस्ट्री, सेडेएंट्री लाईफस्टाईल, व्यसनाधिनता आणि सर्वात मुख्य म्हणजे व्यायामाचा अभाव असणारे सर्व जण आजाराच्या उंबरठ्यावर असतात. त्यांनी आजारापासून दूर राहणे यासाठी या व्याख्यानातून मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे याचा कानमंत्र ते देणार आहेत.

डॉ. गुप्ता मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून  एम.बी.बी.एस. झाले आहेत. दिल्लीतच त्यांनी एम.डी. मेडिसीन, तसेच कॉर्डिअ‍ॅक फेलोशिप पूर्ण केले. डॉ. गुप्ता हे माऊंट अबू येथील ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर येथे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. एम.डी. आणि पीएच.डी. करणार्‍या डॉक्टर्सना ते गाईड म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना हृदयविकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लाईफ टाईम अ‍ॅचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. रशियातील आरोग्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा हेल्दी रशिया अ‍ॅवॉर्डनेही ते सन्मानित आहेत. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि नंतर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात डॉ. गुप्ता यांचा हृदयरोग प्रतिबंध उपचाराबद्दल सलग दोनवेळा गौरव झाला आहे.

इंग्लंड, अमेरिकेसह अनेक देशांतील विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कार्डिऑलॉजी विषयातील शोधनिबंध त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या परिषदेत सादर केले आहेत. भारतासह अनेक देशांत त्यांच्या आरोग्यविषयक कार्यशाळा व व्याख्याने झाली आहेत. 

या व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.