Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Kolhapur › थकीत एफआरपीवरील व्याजाची साखर आयुक्‍तांनी माहिती मागवली

थकीत एफआरपीवरील व्याजाची साखर आयुक्‍तांनी माहिती मागवली

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कृषी मूल्य आयोगाने ठरवून दिलेल्या एफआरपीची रक्‍कम देताना नाकी नऊ आलेल्या साखर कारखान्यांकडून आता थकीत एफआरपीवरील व्याजाची माहिती मागवण्यात आली आहे. साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयामार्फत ही माहिती मागवली आहे. कारखान्यांकडून ही माहिती दिली जाणार नसल्याने संबंधित कारखान्यांच्या लेखापरीक्षकांमार्फत ती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 

यावर्षीच्या हंगामात कृषी मूल्य आयोगाने एफआरपीची ठरवताना साखरेचा दर प्रतिक्‍विंटल 3200 रुपये असेल, असे गृहीत धरले होते. हंगामाच्या सुरुवातीला साखरेला हा दर मिळाला; पण त्यानंतर महिन्याभरात हे दर कोसळले. हे दर प्रतिक्‍विंटल 2500 पर्यंत खाली आले. साखरेच्या उत्पादन खर्चापेक्षा ती कमी दराने विकण्याची वेळ कारखानदारांवर आली. त्यातून मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची देणी थकली. 

संपूर्ण देशभर ही परिस्थिती निर्माण झाली. त्यातून केंद्र सरकारने काही चांगले निर्णय घेऊन या उद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रतिक्‍विंटल 2900 रुपये साखरेचा दर निश्‍चित करणे, गाळप उसाला प्रतिटन 55 रुपये अनुदान, बफर स्टॉक, साखर निर्यातीची सक्‍ती यासारखे निर्णय सरकारने घेतले. त्यानंतर थकीत एफआरपीची रक्‍कम देण्याची प्रक्रिया बहुतांश कारखान्यांनी सुरू केली आहे. तोपर्यंत थकीत एफआरपीवरील व्याजाची माहिती मागवल्याने पुन्हा कारखानदारांसमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

व्याजासह थकीत एफआरपीसाठी शेतकरी संघटनांनी थेट साखर आयुक्‍त कार्यालयालाच लक्ष्य केले आहे. संघटनांच्या या दबावामुळे आयुक्‍त कार्यालयाने राज्यभरातील सर्वच कारखान्यांकडून थकीत एफआरपी व त्यावरील व्याजाची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, राज्यात कारखानदारीचे नेतृत्व व शेतकरी यांच्यात एक घट्ट नाते आहे. त्यामुळेच इथे ठरलेली एफआरपी देण्याची परंपरा आहे.  कच्च्या मालाची किंमत पक्क्या मालापेक्षा जास्त झाली, तर व्यवसाय कोणताही असो त्यात अडचणी येणारच, त्यादृष्टीने याकडे बघितले पाहिजे. केंद्र सरकारनेही त्यादृष्टीने बरीच पावले टाकलेली आहेत, असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे यांनी व्यक्‍त केले.