Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Kolhapur › रायगडाशी कोल्हापूरकरांचे अखंड ऋणानुबंध

रायगडाशी कोल्हापूरकरांचे अखंड ऋणानुबंध

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:29PMकोल्हापूर : सागर यादव 

रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींचा आदर्श घेऊनच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आपली लोककल्याणकारी राजवट राबविली. शिवकार्याची साक्ष देणार्‍या रायगडाच्या जतन-संवर्धनासाठीही त्यांनी आवर्जून प्रयत्न केले. राजर्षी शाहूंचा हा वारसा जपण्याचे कार्य कोल्हापूरकर आजही करत आहेत. रायगडावर दरवर्षी होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भक्‍कम कणा म्हणजे कोल्हापूरकर आहेत. किंबहुना विविध प्रकारच्या सेवेतून कोल्हापूरकरांनी रायगडाशी आपले नाते अखंड जपले आहे. 

शिवसमाधी जिर्णोद्धारासाठी निधी...

रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधी स्थळाच्या जिर्णोद्धारासाठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी भरघोस निधी दिला. इतकेच नव्हे तर पेशवाईत बंद पडलेले शिवशक त्यांनी पूर्ववत सुरू केले. प्रत्यक्ष समाधी जिर्णोद्धारावेळी समाधीतील काही रक्षा कार्बन डेटिंगसाठी काढण्यात आली होती. या रक्षेचा काही अंश दत्ताबाळ मिशनच्या वतीने कोल्हापुरातही आणण्यात आला होता. 

त्रिशताब्दी सोहळ्यात सहभाग...

6 जून 1974 रोजी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याची त्रिशताब्दी झाली. यावेळी कोल्हापूरकरांनी रायगडासह कोल्हापुरातही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला होता. शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक व त्यांच्या सहकार्‍यांनी शिवछत्रपतींचा स्फूर्तीदायी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती. लवाजम्यासह हत्तीवरून भव्य मिरवणूक आणि साखर वाटप करण्यात आली होती. 

संशोधक आणि अभ्यासकांचीही परंपरा...

रायगडाच्या इतिहासाच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाबरोबरच कालओघात दडलेला इतिहास प्रकाशात आणण्यासाठी कोल्हापुरातील इतिहास संशोधक व अभ्यासकांनी आपले संशोधनकार्य अखंड ठेवले आहे. शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीष जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक राम यादव, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, डॉ. अमर आडके अशा अनेकांनी रायगडासह पंचक्रोशीचा विविध अंगाने अभ्यास सुरू ठेवला आहे.  

रायगडाचे वारकरी...

रायगडाला जाणार्‍या वारकर्‍यांचीही कोल्हापूरला प्रदीर्घ परंपरा आहे. कैलासगडची स्वारी मंदिराचे भजनी मंडळ दरवर्षी रायगडावर सेवा बजावते. शिवशाहीर राजू राऊत, शाहीर परिषदेचे शाहीर शहाजी माळी, शिवशाहीर दिलीप सावंत, शाहीर रंगराव पाटील, शाहीर आझाद नायकवडी, कृष्णात पाटील, युवराज पाटील यांच्यासह नवोदित शाहीर आपली सेवा वेळोवेळी बजावत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानसह कोल्हापुरातील विविध शिवकालीन युद्धकला आखाडे रायगडावरील विविध कार्यक्रमांत सेवा बजावत आहेत. गडावर येणार्‍या लोकांसाठी अन्‍नछत्राच्या माध्यमातून अजय पाटील यांनी आपली सेवा अखंड बजावली आहे.  शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, विनायक फाळके, संजय पोवार, राहुल शिंदे, सागर दळवी, उदय घोरपडे, प्रसन्‍न मोहिते व त्यांच्या सहकार्‍यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आपली सेवा अखंड राखली आहे. 

पर्यावरणपूरक कार्य...

रायगडाच्या इतिहासाबरोबरच तेथील पर्यावरणाचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे, या उद्देशाने अनेक पर्यावरणप्रेमी यथाशक्‍ती सेवा बजावत असतात. जाखले येथील पी.एस. तथा पांडुरंग पाटील प्रतिवर्षी गडावर वृक्षारोपण करतात. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्गमित्र अनिल चौगुले, उदय गायकवाड, पर्यावरण अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांनीही गडाच्या पर्यावरणीय विविधतेवर विशेष अभ्यास सुरू ठेवला आहे. 

शिवराज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रीय सणाचे स्वरूप...

रायगडावर प्रतिवर्षी 6 जून रोजी साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सव आणि राष्ट्रीय सणाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून त्यांनी हा सोहळा जगभर पोहोचविला. इतकेच नव्हे तर रायगडाच्या जतन-संवर्धन संरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून रायगड विकास प्राधिकरण निर्माण करून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी रायगडासाठी उपलब्ध केला. रायगडावरील पर्यावरणाचे जतन व्हावे, याकरिता सौ. संयोगीताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकमुक्‍त रायगडाची संकल्पना व्यापक पद्धतीने राबविण्यात आली. नव्या पिढीसह हा वारसा अखंड राखण्याचे कार्य शहाजीराजे व त्यांचे सहकारी करत आहेत. यासाठी शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था-संघटनांचा सक्रिय सहभाग आहे.