होमपेज › Kolhapur › विमा अधिकार्‍याचा खणीत बुडून मृत्यू

विमा अधिकार्‍याचा खणीत बुडून मृत्यू

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 12:20AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

रंकाळा तलाव परिसरात फिरण्यास गेलेले सदाशिव निवृत्ती खेडकर (वय 58, रा. मिताक्षी अपार्टमेंट, अंबाई टँक) याचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह पतौडी खणीत तरंगताना मिळून आला. याची नोंद राजवाडा पोलिस ठाण्यात आली. 

सदाशिव खेडकर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) लक्ष्मीपुरी शाखेत विकास अधिकारी म्हणून नोकरीस होते. कामावरून आल्यानंतर ते सायंकाळी फिरण्यासाठी रंकाळा तलाव परिसरात जात होते. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुला सुरेंद्र याने राजवाडा पोलिसांत वर्दी दिली. मंगळवारी सकाळी नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, पतौडी खणीत एक मृतदेह तरंगताना मिळून आल्याने त्याचा पंचनामा सुरू होता. याठिकाणी जाऊन पाहिले असता तो मृतदेह सदाशिव खेडकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे.