Sat, Feb 16, 2019 15:30होमपेज › Kolhapur › संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हे

संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हे

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 14 2018 12:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षणाचे कंपनीकरण थांबवा, या मागणीसाठी शाळा कृती समितीच्या वतीने मंगळवारी शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या रास्ता रोकोबाबत संस्थाचालक, शिक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. 

दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, सुप्रिटेंडंट कादर मलबारी यांच्यासह संचालक, शिक्षकांविरोधात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर बेकायदा जमाव केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शाळा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गेले दोन दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवारी शहरातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावरच परिपाठ घेतला. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. याप्रकरणी संबंधित शाळांचे शिक्षक, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आजरेकर, मलबारी, संचालक रमजान मुल्‍ला यांनी संस्थेच्या नेहरू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना घेऊन दसरा चौकात परिपाठ घेतला. याप्रकरणी कलम 341 व 34 नुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल, विक्रम हायस्कूल, शिवाजी पार्क, जीवन कल्याण विद्यामंदिर, कसबा बावडा, शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल या शाळांच्या शिक्षकांवर गुन्हे नोंद करण्यात आले.

लाड चौकातील आंदोलनाबाबत राजवाडा पोलिसांनी रा. ना. सामाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पल्‍लवी प्रमोद वडणगेकर यांच्यासह 4 ते 5 शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. तसेच न्यू हायस्कूल मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा तुकाराम कांबळे यांच्यासह शाळेतील 4 ते  5 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. यासह शहरात अन्यत्र झालेल्या आंदोलनात सहभागी शिक्षकांची माहिती घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. या सर्वांची नावे निष्पन्‍न करुन गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.