Tue, Apr 23, 2019 22:44होमपेज › Kolhapur › संस्थानकालीन कागलकर हाऊसला झळाळी!

संस्थानकालीन कागलकर हाऊसला झळाळी!

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:12PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या 17 वर्षाच्या वैभवशाली सुवर्णकाळाचा साक्षीदार आणि छत्रपती शाहू कालीन संस्थानाच्या पाऊलखुणा अंगाखांद्यावर बाळगणारे कागलकर हाऊस आपला ऐतिहासिक बाज सांभाळतच नव्या काळात कात टाकण्यास सज्ज झाले आहे. या ऐतिहासिक वाड्याचे अंतर्बाह्य सौंदर्य खुलवण्याची जबाबदारी बांधकाम विभागाने घेतली आहे. 

या ऐतिहासिक वास्तूने जि.प.चा 1977 ते 1994 असा तब्बल 17 वर्षाचा वैभवशाली कारभार पाहिला आहे. जि.प.चे दुसरे अध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या काळात करवीर पंचायत समितीतून जि.प.चा कारभार या इमारतीत  स्थलांतरित झाला. आतापर्यंतच्या 21 अध्यक्षांपैकी तब्बल 7 अध्यक्षांचा सुवर्णकाळ कागलकर हाऊसने अनुभवला आहे. मिनी मंत्रालयाचा रुबाबही मिरवला आहे. 1994 साली प्रकाश पाटील-अंबपकर अध्यक्ष असताना सध्याच्या प्रशासकीय इमारतीत जि.प.चे स्थलांतरण झाले. तेव्हापासून कागलकर हाऊसचे महत्त्व कमी होऊ लागले. 

अलीकडे तर या वास्तूत अनेक प्रयोग झाले. अखेर हेरिटेज वास्तू म्हणून दर्जा मिळाल्यानंतर यातील मोडतोडीला बर्‍यापैकी आळा बसला आहे, पण हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची दानत नसल्याने वैभवाच्या खुणा घेऊन हा वाडा अलीकडे बकालपणा अनुभवत आहे. दोन वर्षांपूर्वी याचे रूपांतर रेस्ट हाऊस व हॉटेलमध्ये करण्याचाही घाट घातला गेला, पण तो हरिटेज दर्जामुळे हाणून पाडला गेला. 
 या इमारतीत सध्या जि.प. शी संलग्न सहा कार्यालये आणि परिसरात बँक, जिमसह आणखी सहा कार्यालये आहेत. ही कार्यालये भाड्याच्या रूपाने जि.प. च्या उत्पन्नात तीस लाखांहून अधिक रुपयांची भर टाकतात, पण दुर्लक्ष झाल्याने ही इमारत जीर्ण होऊ लागली आहे. बर्‍याच ठिकाणी मोडतोडही झाली आहे. बर्‍याच मागणीनंतर अखेर डागडुजीसाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. जवळपास 50 लाखांची तरतूद केली असून, पहिल्या टप्प्यात 20 लाखांतून पेव्हिंग ब्लॉक, रंगकाम, पोर्च स्लॅप गिलावा आदी कामे हाती घेतली आहेत. येथेच सभागृहाचेही नूतनीकरण होत आहे. दुसर्‍या टप्प्यात या वास्तूच्या परिसरात पार्किंग स्टँडसह वृक्षारोपणाचेही नियोजन आहे. सदाहरित, वनौषधी वृक्ष लावण्याची संपूर्ण जबाबदारी बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. काही ठराविक भागापुरतेच सुशोभिकरण सीमित न ठेवता संपूर्ण इमारतीचे करून हा ऐतिहासिक वारसाचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.