Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Kolhapur › इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर ‘अन्याय’

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर ‘अन्याय’

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 1:07AMकोल्हापूर : विजय पाटील 

मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधील तृतीय वर्षाच्या  पहिल्या सेमिस्टरमध्ये काही विषयांत अनेक विद्यार्थी नापास झाले. प्रत्यक्षात फोटोकॉपी  तपासली असता, या विषयांमध्ये गुण कमी दिले असल्याचा त्यांचा दावा होता. मग रिव्हॅल्युएशनसाठी सर्वांनीच अर्ज केला. रिव्हॅल्युएशनचा निकाल लागलेला नसताना पुन्हा याच विषयांचे मंगळवारपासून (दि. 24) पेपर सुरू होत आहेत. त्यामुळे हे सारे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून अन्याय होत आहे, अशी त्यांची भावना झाली आहे. इंजिनिअरिंग हा विषय  व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे घोकंपट्टीपेक्षा प्रॅक्टिकलला या अभ्यासक्रमात जास्त महत्त्व आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी हे अभ्यासमग्न असतात. कधी कधी एखाद्या विषयात कमी गुण मिळणे अभ्यासक्रमात कॉमन फॅक्टर असू शकतो.  पण, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाने केलेला सध्याचा प्रकार  त्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे. 

याबाबतचे प्रातिनिधिक उदाहरण असे की, बीई मॅकेनिकल (3) अभ्यासक्रमातील पहिल्या सेमिस्टरचा निकाल 20 जानेवारीस लागला. निकालानंतर काही विषयांत बहुतांश विद्यार्थी नापास झाले होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी तत्काळ परीक्षा विभागाकडे उत्तरपत्रिकेची फोटोकॉपीची (लिहिलेल्या पेपरची प्रत) मागणी केली. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना एक-दोन आठवड्यांत फोटोकॉपी मिळायला हवी होती. कारण, विद्यार्थी या गोष्टींसाठी पैसे मोजतो. पण, ही फोटोकॉपी विद्यार्थ्यांच्या हातात 12 मार्चच्या सुमारास म्हणजे तब्बल पावणेदोन महिन्यांनी  पडली. संबंधित विद्यार्थ्यांनी त्या विषयांची फोटोकॉपी त्यांच्या प्राध्यापकांकडून तपासून घेतली. तपासनीनंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, असे लक्षात आल्यानंतर जवळपास सर्वांनीच रिव्हॅल्युएशनसाठी 15 मार्चच्या सुमारास अर्ज केला. याचा निकाल लगेच लागेल आणि नापास झालेल्या विषयाचा पेपर पुन्हा द्यावा लागणार नाही, असाच या विद्यार्थ्यांचा व्होरा होता.

पण, मंगळवारी हे पेपर सुरू होत आहेत. अजूनही रिव्हॅल्युएशनचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. कारण, फोटोकॉपीवरून त्यांनी तज्ज्ञांकडून तपासलेल्या पेपरमध्ये त्यांना चांगले गुण मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना हे पेपर द्यावे लागणार नाहीत, असा आत्मविश्‍वास आहे. असे असताना प्रशासनाने अद्याप निकालच लावलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. विद्यार्थीकेंद्रित धोरणे राबवत असल्याचा उठता-बसता जप करणार्‍या विद्यापीठ प्रशासनाच्या या वेंधळ्या कारभाराला  जबाबदार कोण, असा सवाल विद्यार्थी करू लागले आहेत. आता या अन्यायावर  थातूर-मातूर कार्यवाही केली जाईल आणि मागच्याच चुकांची पुढे पुनरावृत्ती, असे नेहमीसारखे काम सुरू राहील, असे म्हणायला वाव आहे. 

Tags : Kolhapur,  Injustice, students,  engineering