Fri, Apr 19, 2019 08:35होमपेज › Kolhapur › निर्यातीसाठी लघु उद्योजकांना भविष्यात संधी : ना. देसाई

निर्यातीसाठी लघु उद्योजकांना भविष्यात संधी : ना. देसाई

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 05 2018 1:02AMइचलकरंजी : प्रतिनिधी

उद्योजकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नवे धोरण राबवले जाणार आहे. त्यामध्ये लघु उद्योजकांना निर्यातीसाठी अनेक प्रोत्साहनपर योजनाची रचना करण्यात  येणार आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना भविष्यात मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. हातकणंगले तालुक्यातील नेज येथे होणार्‍या लघु औद्योगिक वसाहतीस सर्वतोपरी सहाय्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हुपरी परिसरातील लघु उद्योगांना सहाय्य केल्यास ते जगाची बाजारपेठ काबीज करतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

इचलकरंजी येथे आयोजित निर्यात मार्गदर्शन परिषदेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे आणि उपाध्यक्ष संजय चौगुले यांनी संस्थेची माहिती देऊन परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. 
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, किर्लोस्कर, अंबानी यांची प्रेरणा घेऊन आपला स्वत:चा ब्रँड कसा विकसित करता येईल हे ध्येय बाळगले पाहिजे. त्यासाठीच उत्कर्ष उद्योजक संस्था कार्यरत असल्यामुळे त्याचा अभिमान आहे. हुपरी परिसरातील लघु उद्योगांना सहाय्य करण्यासाठी सिल्व्हर क्लस्टरला अधिक वेगाने चालना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले. 
आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी मराठी लघु उद्योजकांकडे प्रचंड ऊर्जा आणि कष्ट करण्याची तयारी, जिद्द आहे. मात्र, त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभत नाही. परिणामी, तो स्पर्धेत मागे पडतो. मात्र, यापुढे उत्कर्ष संस्थेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय उन्नतीची संधीही मिळणार आहे.

परिषदेत फेडरेशन ऑफ फे्रट फॉरवर्डस् असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिभूषण वैद्य यांनीही मार्गदर्शन केलं. दिवसभरात रवींद्र दातार यांचे भारतीय लघु उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची आंतरराष्ट्रीय वृद्धी कशी करावी, करुणाकर शेट्टी यांनी आयात-निर्यात वाहतूक व्यवस्थापन, मुकेश हुंडिया यांनी मार्केटिंग तर भालचंद्र ठिगळे यांनी बिलिंग आणि सरकारी योजना याबाबत मार्गदर्शन केले. लघु उद्योग क्षेत्रात काम करणारे कोकणातील उद्योजक माधव महाजन, यवतमाळ येथील फळ प्रक्रिया उद्योजक राजेंद्र मात्रे, पुसेगाव येथील जर्नादन मुळे यांचा सत्कार मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. आभार ‘स्लिमा’चे अध्यक्ष शीतल केटकाळे यांनी मानले.