Sat, Apr 20, 2019 08:11होमपेज › Kolhapur › पानसरे हत्येत अंदुरेचं कनेक्शन?

पानसरे हत्येत अंदुरेचं कनेक्शन?

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सचिन अंदुरेेचे ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येत कनेक्शन असावे, असा एसआयटी वरिष्ठ सूत्रांचा संशय आहे. त्यामुळे एसआयटीचे स्थानिक पथक रात्री तातडीने पुण्याला रवाना झाल्याचे समजते. अंदुरे हा डॉ.वीरेंद्रसिंह तावडेचा विश्‍वासू सहकारी असल्याचे एटीएस व सीबीआय चौकशीत उघड झाल्याने सहभागाची शक्यता अधिक गडद असल्याचेही सूत्राकडून सांगण्यात आले. 

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने यापूर्वी डॉ. तावडे व समीर गायकवाडला दोन वर्षांपूर्वी अटक केली आहे. तर अन्य दोन संशयित विनय पवार, सारंग अकोळकर याना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. रेकॉर्डवर आलेल्या चारही मारेकर्‍यांशिवाय आणखी काही संशयितांचा हत्येचा कटात सहभाग असावा? असा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा यापूर्वीही संशय होता. मात्र, निश्‍चित धागेदोरे हाती लागत नव्हते.

कळसकरचे मुंबई-पुण्यातले  मित्र कोल्हापूरच्या संपर्कात

संशयित अंदुरे हा डॉ. तावडेचा विश्‍वासू सहकारी तसेच कोल्हापुरात चार वर्षे तळ ठोकून राहिलेल्या शरद कळसकरचा जीवलग मित्र असल्याचे एटीएस व सीबीआय चौकशीत निष्पन्‍न झाल्याने एसआयटीच्या हालचाली रविवारपासून गतिमान झाल्या आहेत.कळसकरच्या चार वर्षांच्या कोल्हापूर वास्तव्यात मुंबई-पुण्यातील अनेक मित्र त्याला येथे भेटायला येत होते. काही मित्र तर त्याच्या खोलीवर मुक्‍कामाला होते, अशीही माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.

तपासाबाबत गोपनीयता

अंदुरेच्या चौकशीत अनेक धक्‍कादायक बाबी उघड होऊ लागल्याने कॉ.पानसरे हत्येच्या कटातही त्याचा सहभाग असावा का? अशी शक्यता वरिष्ठ अधिकार्‍यांतून व्यक्‍त होऊ लागली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार रात्री एसआयटीचे स्थानिक पथक पुण्याला रवाना झाले आहे. मात्र, याबाबत कमालीची गोपनीयतेची खबरदारी घेण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याशी माध्यमानी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकार्‍यांनी बोलण्याचे टाळले.