Sun, Jul 21, 2019 17:06
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › इंदिरादेवी जाधव ज्यु. कॉलेजच्या नव्या इमारतीचा वास्तुशांत समारंभ  

इंदिरादेवी जाधव ज्यु. कॉलेजच्या नव्या इमारतीचा वास्तुशांत समारंभ  

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:52AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा वास्तुशांत समारंभ पार पडला. संस्थेचे अध्यक्ष कल्‍लाप्पाणा नडदगल्‍ली यांच्या हस्ते सपत्नीक पूजा व होमहवन झाले. या इमारतीची पाहणी दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी करून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या आणखी वाढीव कामाच्या सूचनाही यावेळी दिल्या. 

दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ.प्रतापसिंह जाधव यांच्या मातोश्री इंदिरादेवी जाधव यांचे मूळ गाव नूल (ता. गडहिंग्लज) असून त्यांच्या स्मृती चिरतरुण रहाव्यात, यासाठी डॉ.जाधव यांनी येथील मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सेवासुविधांनी परिपूर्ण अशी इमारत बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत नूल येथे भव्य अशी इमारत उभारली असून, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा उभारली आहे. पाहणीनंतर डॉ. जाधव यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणखी काही सेवासुविधा वाढवण्याबाबत सूचना दिल्या. 

डॉ. जाधव म्हणाले, नूलसारख्या  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची चांगली संधी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उपलब्ध असून, यासाठी आवश्यक असणारी इमारत बांधून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही इमारत विद्यार्थ्यांना शिक्षणाभिमुख कशी होईल, याकडे लक्ष दिले आहे. नव्या इमारतीमुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून, ग्रामीण भागातील मुलीही यामुळे विज्ञान शाखेचे शिक्षण घेऊ शकतील. या शाळेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्यामध्ये कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.

यावेळी संचालक विनोद नाईकवाडी, प्राचार्य टी. एम. राजाराम, पर्यवेक्षक जी. आर. चोथे, विलास कुलकर्णी, के. एस. जाधव, भीमाप्पा मास्तोळी, रामगोंडा पाटील, परशराम कापसे, ठेकेदार जयसिंग चव्हाण, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, एस. आर. थोरात आदी उपस्थित होते.