Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Kolhapur › ‘पुढारी’कारांच्या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान

‘पुढारी’कारांच्या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान

Published On: May 13 2018 2:14AM | Last Updated: May 13 2018 12:35AMदै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी माझ्या मतदारसंघातील नूलसारख्या गावात शिक्षणाची ज्ञानगंगा अधिक वेगाने पोहोचावी, या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून सुसज्ज अशी विज्ञान शाखेसाठीची इमारत बांधली. ‘पुढारी’कारांचे हे काम सर्वांसाठी आदर्शवत असून, याच कामात मला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली. आदरणीय साहेबांनी या आवारात रस्त्यासाठी निधीची मागणी केली. आम्हीही ती तत्काळ मंजूर करत त्यांच्या कामात खारूताईचा वाटा म्हणून सहभाग नोंदविला आहे.

स्व. बाबासाहेब कुपेकर व डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे शालेय शिक्षणापासूनच एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. यामुळे कुपेकरांच्या राजकीय जीवनात डॉ. जाधव यांनी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात, मोलाचे सल्‍ले देण्याचे काम केले.  या दोघांमधील या स्नेहसंबंधांमुळेच घरामध्ये स्व. कुपेकर, डॉ. जाधव यांच्याबद्दल अत्यंत करारी संपादक, लोकोत्सवासाठी प्रेरणा देणारा, ज्वलंत राष्ट्रनिष्ठ असणारा, सामाजिक समतेमध्ये अग्रणी अशा उच्च शब्दांमध्ये त्यांचे कौतुक करीत. त्यामुळे आम्हा सर्व कुपेकर कुटुंबीयांमध्ये त्यांच्याबद्दल तितकाच आदर व अभिमान आहे.

नूल हे माझ्या मतदारसंघातील गाव असून या ठिकाणी डॉ. जाधव यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरादेवी यांचा जन्म झाला. या कर्तृत्ववान मातेच्या पोटीच डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी जन्म घेऊन आजवर इतका दैदीप्यमान पराक्रम केला आहे. आपल्या मातेच्या स्मृती त्यांच्या गावात चिरतरुण राहाव्यात, यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक शिक्षणाचे क्षेत्र निवडले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते निशस्त्र माणसालादेखील अतिशय ताकदवान बनवते. त्यामुळे या शिक्षणक्षेत्रातच आपण आपल्या आईच्या स्मृती जागवत ठेवू, या उद्देशाने येथील न्यू इंग्लिश प्रशालेला सुसज्ज अशी इमारत बांधून देण्याचा त्यांनी निर्धार केला.

केवळ कशी तरी इमारत उभी करणे व लोकांसाठी दाखविण्यासाठी एखादे काम केल्याचे उसणे अवसान आणणे, हे डॉ. जाधव यांच्या रक्‍तातच नाही. त्यामुळे आईंच्या नावची शाळा ही अतिशय दिमाखात उभी असणारीच असावी. जाधव घराण्याच्या कर्तृत्वाला शोभेल, अशाच प्रकारे ती भव्य वास्तू अवघ्या दहा महिन्यांत साकारून या परिसरातील शिक्षणाला एक वेगळी दिशा दिली आहे. 

नूल परिसरातील मुलींना विज्ञान शाखेचे शिक्षण घेणे फार अडचणीचे होत होते. चांगले गुण मिळून देखील या परिसरातील मुली विज्ञान शाखेला प्रवेश घेऊ शकत नव्हत्या. डॉ. जाधव यांनी आईंच्या स्मृती जपताना सर्वात प्रथम येथे विज्ञान शाखा सुरू करून अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा उभारून या परिसरातील मुलांच्या शिक्षणाची अतिशय चांगली सोय केली आहे.

जनतेच्या दरबारात सातत्याने जनतेबरोबर संवाद साधत ‘पुढारी’ने जनमाणसांत आपली वेेगळी प्रतिमा उभारली आहे. ‘पुढारी’पणाच्या ब्रीदवाक्याला साजेसे असेच हे कार्य ‘पुढारी’ने केले आहे. यापूर्वी सियाचीनसारख्या अतिदुर्गम भागात भारतीय सैनिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारून आपले राष्ट्रप्रेम दाखवले, तसेच नूलमध्ये सर्वाधिक स्वातंत्र्यसैनिक असून या गावात शाळा बांधून दिल्याने हाही वेगळा योगायोग आहे.

गुजरातमधील भूकंपग्रस्त असोत, अथवा देशात कोणत्याही ठिकाणी आलेली राष्ट्रीय आपत्ती असो या सर्वच ठिकाणी ‘पुढारी’ अग्रक्रमाने मदतीसाठी धावलेला दिसून येतो. कोल्हापूर जिल्ह्यात कोणताही जनहिताशी संबंधित प्रश्‍न असो डॉ. जाधव हे त्यामध्ये स्वतः लक्ष घालून तो सोडविल्याखेरीज स्वस्थ बसत नाहीत. यामुळे कोल्हापूरच्या जनतेत त्यांना एक वेगळे सन्मानाचे स्थान आहे. नूलमध्ये अशाच प्रकारे डॉ. जाधव यांचे शाळेच्या बांधकामाच्या निमित्ताने सहकार्य मिळाले असून, आगामी काळातही त्यांच्याकडून अशाच प्रकारची सामाजिक कामे होवोत..हीच सदिच्छा...

आमदार संध्यादेवी कुपेकर
चंदगड विधानसभा मतदारसंघ.