Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Kolhapur › पोस्टाची पेमेंट बँक जुलैमध्ये कोल्हापुरात

पोस्टाची पेमेंट बँक जुलैमध्ये कोल्हापुरात

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 12:02AMकोल्हापूर : शेखर दुग्गी

पोस्टाची पेमेंट बँक जुलैमध्ये कोल्हापुरात सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकेप्रमाणे पोस्टातूनही व्यवहार करता येणार आहे. गोवा विभागांतर्गत रमणमळा येथील प्रधान डाक कार्यालयात ही बँक सुरू होणार आहे. पोस्टाच्या 14 लाखांहून अधिक ग्राहकांना बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.

ग्राहकांना विश्‍वासहार्य आणि आपुलकीची सेवा देणार्‍या पोस्टाचे जाळे खेडोपाडी, वाड्यावस्त्यात पसरले आहे. तुलनेत अजूनही बँका खेडोपाडी पोहोचल्या नाहीत. अनेक शेतकर्‍यांना गावात बँक नसल्याने शहर किंवा नजीकच्या मोठ्या गावात पदरमोड करून जावे लागते. बँकिंग क्षेत्राला खेड्यापर्यंत नेण्यासाठीच भारतीय टपाल खात्याने पेेमेंट बँक ही संकल्पना राबवली आहे.

गोवा विभागांतर्गत ही बँक कोल्हापुरात सर्वात प्रथम सुरू होणार असल्याने पोस्टाच्या ग्राहकांकरिता ही आनंदाची गोष्ट आहे. प्रधान कार्यालयात बँकेसाठी जागा निश्‍चित झाली असून, बँकिंग डाटाही तयार झाला आहे. जुलैमध्ये ही बँक ग्राहक सेवेत दाखल होईल. बँक सुरू झाल्यानंतर मोबाईल कंपन्या, अन्य संस्थांना व्यक्‍ती अथवा छोट्या उद्योजकांना सेवा देता येणार आहे. टप्प्याटप्प्याने खेड्यापाड्यात त्याचे जाळे विणले जाणार आहे. 

पेमेंट बँकेची वैशिष्ट्ये

पेमेंट बँकेअंतर्गत ग्राहकांना टपाल कार्यालयातील त्यांच्या खात्यातून ठराविक रक्‍कम अन्य कोणत्याही बँकेत हस्तांतर करता येणार आहे. याशिवाय, टपाल बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करून अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येईल. 

अन्य कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना एटीएम कार्डच्या माध्यमातून पोस्टाच्या एटीएम केंद्रातून पैसे काढता येणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँकेद्वारे घेता येईल. यासोबत म्युच्युअल फंड, इन्श्युरन्स सेवाही मिळणार आहे.

पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्टाचा चेहरामोहरा बदलणार आहे. ग्राहकांना बँकेतून व्यवहार करणे सोपे जाणार आहे. जुलैअखेर ही बँक सुरू होईल.
- आय. डी. पाटील, प्रवर डाक अधीक्षक, कोल्हापूर