Sun, Jul 21, 2019 16:16
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोणी, जागा देता का जागा?

कोणी, जागा देता का जागा?

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूरसह सांगली, सातारा व कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील तणावग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी स्थापन झालेल्या भारत राखीव बटालियनला गेली दहा वर्षे जागेचा शोध सुरू आहे. कोल्हापूर हे या बटालियनचे मुख्यालय असूनही या तुकडीतील कर्मचारी मुंबई, पुणे, दौंड या ठिकाणी ठेवण्याची वेळ आली आहे. 

राज्यात राज्य राखीव दलाचे 15 गट आहेत. 2010 पूर्वी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत घडलेल्या काही संवेदनशील घटनांच्या पार्श्‍वभूमीवर 16 गट कोल्हापुरात स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार डिसेंबर 2008 मध्ये या गटाची स्थापना होऊन जवानांची भरतीही झाली. या गटाचे मुख्यालय हे कोल्हापुरातच राहावे, यासाठी त्यावेळी प्रयत्न झाले; पण जागेचा अडसर मोठा होता. 
कार्यालय, कर्मचारी, अधिकारी यांची निवास व्यवस्था, स्वयंपाकघर यासाठी या बटालियनला 100 एकर जागेची गरज आहे. सुरुवातीच्या काळात मजले येथील जागा उपलब्ध झाली. मजले व तमदलगे गावातील प्रत्येकी 50 एकर जमिनीच्या सात-बारा पत्रकी बटालियनचे नावही चढले; पण त्यावर असलेल्या वन विभागाच्या आरक्षणामुळे या जागेचाही प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. 
14 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली; पण गेल्या दोन वर्षात यासाठी एक कागदही हललेला नाही. 

मजलेनंतर रेंदाळ, दिंडनेर्ली, मौजे वडगाव, कासारवाडी, राधानगरीत जागेचा शोध सुरू झाला. काही गावांनी विरोध केला, तर राधानगरीत जागा तयार आहे, ग्रामपंचायत ती द्यायलाही तयार आहे; पण त्याचा पाठपुरावा होत नाही. सुमारे 700 जवानांचा समावेश असलेल्या या बटालियनचे कोल्हापूर हे मुख्यालय असूनही आज जवान मात्र मुंबई, पुणे, दौंड या ठिकाणी ठेवले आहेत. काही कर्मचारी कोल्हापुरातही आहेत; पण त्यांना काही काम नसल्यासारखी स्थिती आहे.