होमपेज › Kolhapur › साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकून भारत बनणार जगात नंबर १..!

साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकून भारत बनणार जगात नंबर १..!

Published On: Sep 07 2018 9:11AM | Last Updated: Sep 07 2018 9:54AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात आगामी हंगामासाठी उपलब्ध असलेल्या विक्रमी ऊस उत्पादनामुळे आजपर्यंत साखरेच्या जागतिक नकाशावर दुसर्‍या क्रमांकावर असलेला भारत यंदा साखरेच्या जागतिक राजधानी पदाची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहे. हा बहुमान म्हणजे काटेरी मुकुट असून हंगामादरम्यान उत्पादित होणार्‍या साखरेच्या विल्हेवाटीसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर देशातील साखर धंद्यावर मोठे आर्थिक अरिष्ट कोसळू शकते, असा अंदाज विश्‍लेषकांकडून वर्तविण्यात येतो आहे.

जागतिक साखर उद्योगामध्ये ब्राझील हा देश साखरेचे नेतृत्व करतो. या देशामध्ये प्रतिवर्षी सरासरी 360 ते 390 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होते. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतामध्ये हे उत्पादन सरासरी 260 ते 280 लाख मेट्रिक टनावर असते. पर्जन्याचा कल बदलल्याने साखर धंद्यातही उन्हाळे-पावसाळे असतात. यानुसार साखरेचे उत्पादन कमी-जास्त होऊन जागतिक बाजारात तेजी-मंदीचे गणित मांडले जाते. गेल्या दोन वर्षांत या उत्पादनाच्या तेजी-मंदीचा अनुभव भारत घेतो आहे. 2016-17च्या हंगामात भारतामध्ये उसाचे उत्पादन घटल्याने साखर उत्पादन 201 लाख मेट्रिक टन इतके नोंदविले गेले होते. 2017-18 मध्ये ऊस वाढल्याने हे उत्पादन 322 लाख मे. टनावर गेले. तर 2018-19च्या आगामी हंगामात हे उत्पादन 355 लाख मे. टनावर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. याउलट ब्राझीलमध्ये यंदा 22 टक्क्यांनी घटून ते 300 लाख मे. टनावर खाली येण्याचा अंदाज आहे. 

भारतातील अतिरिक्‍त साखरेच्या उत्पादनाने जागतिक राजधानीचा मुकुट परिधान करण्याची संधी भारताला मिळाली असली तरी ही स्थिती मोठी आपत्तीजनक असल्याचे विश्‍लेषकांचे मत आहे. कारण भारतामध्ये ब्राझीलप्रमाणे कारखानदारी मुक्‍त नाही. भारतात उसाच्या दरावर सरकार नियंत्रण ठेवते, पण बाजारातील साखरेचा दर वाढला की मात्र अस्वस्थ सरकार कारखानदारीच्या मुसक्या बांधण्यास सुरुवात करते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतली तर केंद्राला साखरेच्या आयात-निर्यातीची धोरणे अत्यंत काटेकोरपणे राबवावी लागतील. त्याचबरोबर अधिकत्तम ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळेल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. 

Image may contain: text