Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात समान नावाचे 2.22 लाख मतदार

नावात 'बरंच' काय आहे; समान नावाचे 2.22 लाख मतदार

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 9:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 22 हजार 390 मतदारांना भारत निवडणूक आयोगाने नोटिसा काढल्या आहेत. नोटिसा काढण्यात आलेले मतदार हे मतदारयादीतील एकसारख्या नावाचे आहेत. खरोखरच एकसारख्या नावाचे अनेक मतदार आहेत की, एकाच मतदाराचे मतदारयादीत दुबार नाव आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.

मतदारयादीत दुबार मतदारांची संख्या अधिक आहे. मतदारांचे एकाच ठिकाणी मतदार म्हणून नावनोंदणी असणे आवश्यक आहे. दुबार नोंदणीमुळे मतदानातील गैरप्रकारात वाढ होण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्‍वभूमीवर भारत निवडणूक आयोगानेच मतदारयादीतील दुबार नावे शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. याकरिता एकसमान नाव असलेले मतदार निश्‍चित करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात 29 लाख 69 हजार 454 मतदारांची मतदारयादीत नोंद आहे. या मतदारयादीत समान नावे असलेल्या मतदारांची संख्या आहे. मतदारांचे संपूर्ण नाव, वय आदीद्वारे जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील मतदारयादीनुसार समान नावे असलेले मतदार शोधण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या मतदारयादीत तब्बल 2 लाख 22 हजार 390 मतदारांची नावे एकसारखीच असल्याचे आढळून आले आहे. या नावांपैकी एकसमान दोन नावे असलेल्या मतदारांची संख्या 1 लाख 52 हजार 444 इतकी आहे. मतदारयादीत एकसारखी तीन नावे असलेल्या मतदारांची नावे 32 हजार 556 इतकी आहेत. एकसमान चार नावे असलेल्या मतदारांची संख्या 22 हजार 320 इतकी आहे, तर एकाच नावाचे पाच मतदार असलेल्यांची संख्या 15 हजार 70 इतकी आहे.  

समान नावे असलेल्या या मतदारांना थेट ‘बीएलओं’मार्फत नोटिसा देण्यात येत आहेत. या नोटिसांद्वारे संबंधितांचे मतदारयादीत नाव खरोखरच समान आहे की, एकाच नावाची दुबार नोंद झाली आहे, याची खातरजमा करून घेतली जाणार आहे. मतदारयादीत मतदारांची दुबार नोंदणी असेल, तर संबंधितांकडून फॉर्म भरून घेतला जाईल आणि त्याच्या पसंतीने एकाच ठिकाणी मतदारयादीत नाव ठेवण्यात येणार आहे. समान नावे असलेल्या मतदारांपैकी दुबार मतदार किती, हे 31 डिसेंबरनंतर स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील स्थिती...

समान नाव असलेले मतदार     2,22,390
दोनवेळा समान नाव असलेले मतदार      1,52,444
तीनवेळा समान नाव असलेले मतदार      32,556
चारवेळा समान नाव असलेले मतदार     22,320
पाचवेळा समान नाव असलेले मतदार     15,070
एकूण मतदार    29,69,454