Tue, Apr 23, 2019 08:08होमपेज › Kolhapur › देवस्थान जमिनींच्या माहितीसाठी स्वतंत्र संस्था

देवस्थान जमिनींच्या माहितीसाठी स्वतंत्र संस्था

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्रात 3 हजार 64 मंदिरे आणि 27 हजार एकर जमिनींचे व्यवस्थापन पाहणार्‍या देवस्थान समितीकडून मंदिरे व जमिनींच्या गैरव्यवहारावर अंकुश आणण्यासाठी स्वतंत्र संस्थेची (कंपनी) नियुक्‍ती करून जमिनी व मंदिरांची माहिती जमा केली जाणार आहे. यामुळे देवस्थान समितीच्या जमिनींबाबतचे अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे. याबाबतचा ठराव समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला असून लवकरच संस्था नेमणुकीसाठी देवस्थान समितीकडून निवादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समजते. 

समितीकडे असलेल्या जमिनींची माहिती समितीकडे नसल्याने आजवर हजारो एकर जमिनींचे गैरव्यवहार झाले आहेत, दुसरीकडे देवस्थानचे कोट्यवधीचे उत्पन्‍न बुडाले आहे. मंदिरांची संपत्ती व जमिनींबाबतचा हा गलथान कारभार थांबून त्यांची समितीकडे व्यवस्थित नोंद व्हावी, कोणत्या मंदिरांचा व जमिनींचा कसा वापर केला जातो या सगळ्याची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी समितीतर्फे असे काम करणार्‍या स्वतंत्र संस्थेची (कंपनी) नियुक्‍ती करण्यात येणार आहे. देवस्थान समितीच्या अखत्यारित 3064 मंदिरे व त्याची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून देण्यात आलेल्या 27 हजार एकर जमीन आहे. वहिवाटदारी व लिलाव या दोन पद्धतीने या जमिनी शेकडो वर्षांपासून कुळांकडे कसायला देण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात समितीला वर्षाला नाममात्र रुपये खंड भरणे अपेक्षित असते. मात्र, जमिनीच्या सातबार्‍यावर देवाचे नाव असतानाही अधिकार्‍यांच्या संगनमताने अनेक नामवंत व्यक्‍तींनी जमिनी स्वत:च्या नावावर केल्या आहे. अशारितीने हजारो एकर जमिनी आणि संपत्तीची परस्पर लूट झाली आहे. अशा 25 जणांवर देवस्थानकडून कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. 

देवस्थानला सात वर्षे अध्यक्षच नव्हता, यासगळ्या प्रकारातून आजवर दोषींवर कारवाई झाली नाही. जुजबी नोटिस बजावण्यापलिकडे देवस्थानचा कारभार कधी गेलाच नाही. सध्या अध्यक्ष महेश जाधव यांनी जमिनींची माहिती घ्यायला सुरवात केली आहे. देवस्थानकडून नेमल्या जाणार्‍या संस्थेत निवृत्त तलाठी, तहसिलदार यांच्यासह तज्ञांचा समावेश असलेली ही समिती 23 तालुक्यांतील जमिन कोणत्या देवाच्या नावे आहे, ती किती एकर आहे, सध्या कोणाकडून कसली जाते, जमिनीचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो, परस्पर विक्री झाली आहे का, अतिक्रमण झाले आहे का, कोणती बेकायदेशीर कामे त्यावर केली जातात, ही सगळी माहिती पुराव्यानिशी देवस्थानला नोंदी व अहवालाच्या रुपात सादर करेल. हे काम दीड वर्ष चालेल.

जमिनींबाबतचे गैरव्यवहार

देवस्थानच्या कुळांकडून जमिनींची परस्पर विक्री, 400 सागवान झाडांची तोड, बेकायदा मत्स्य व्यवसाय, बेकायदा बॉक्साईट उत्खनन, शासनदरबारी चुकीची कागदपत्रे सादर करून जमिनी स्वत:च्या नावावर करून घेणे, प्लॉट पाडून विक्री, अतिक्रमण, जमिनींचा वर्षानुवर्षे खंड न भरणे, जमिनीवर राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे आहेत. समितीकडे कोणत्या मंदिराची किती एकर जमीन आहे, त्या जागेवर काय केले जाते, याची कर्मचार्‍यांनाच माहिती नाही, माहिती असली तरी सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.