Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Kolhapur › दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतंत्र मराठा पक्ष

दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतंत्र मराठा पक्ष

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 13 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाने राजकीय पक्ष स्थापन करावा, असा निर्णय बुधवारी (दि. 12) शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला.

पक्ष स्थापनेची पूर्वतयारी म्हणून महिनाभर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेण्यात येतील, त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्‍वराच्या मंदिरात जाऊन नवीन पक्षाची घोषणा करण्यात येईल, असे मेळाव्याचे समन्वयक सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने केली; पण शासनाने आश्‍वासनाच्या पुढे काहीच दिले नाही. आरक्षण देण्याचे जाहीर केल्यानंतर शासनाने सहा आदेश काढले; पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे आता मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज आहे, यासाठी बुधवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सुरेश पाटील म्हणाले, आजवर मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली; पण आश्‍वासनांशिवाय काहीच मिळू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्‍कासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष असावा काय, याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी मराठा समाजाच्या विकासासाठी पक्ष स्थापन करावा, अशीच भावना सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे पक्ष स्थापन करणार आहोत. त्यासाठी उद्यापासून प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला जाईल. त्या-त्या जिल्ह्यातील मराठा युवकांची मते जाणून घेतली जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध ठराव मांडले, त्याला कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.

बाळ घाटगे म्हणाले, आरक्षणाचा कोणताही लाभ मिळत नसल्याने देशातील मराठी मुलांचा विकास खुंटला आहे. उच्चशिक्षण घेऊन मराठ्यांचे लाखो तरुण बेकार फिरत आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय या तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही आणि ते कौटुंबिक गरज भागवू शकणार नाहीत. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाजाच्या हक्‍काचा राजकीय पक्ष असणे गरजेचे आहे. माजी महापौर सई खराडे म्हणाल्या, शेती करणारा मराठा समाज असल्याने हा समाज सधन आहे; पण नोकरीत आरक्षण नसल्यामुळे हा समाज कुठेतरी मागे जात आहे. माजी पोलिस अधिकारी अजित पाटील म्हणाले, सरकारकडून समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे पक्ष स्थापन करावा, हे प्रत्येकाच्या मनातील वादळ आहे. पक्ष स्थापनेनंतर सर्व जण पक्षाच्या पाठीशी राहिल्यास 2019 च्या निवडणुकीत विधानसभेत बहुमत आल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. प्रसाद जाधव यांनी, समन्वयकांनी राज्याचा दौरा करून युवकांची मते जाणून घ्यावीत, असे सुचवले. कराडच्या वैशाली जाधव म्हणाल्या, सध्या सत्तेवर असलेल्या पक्षाने थेट हुकूमशाही सुरू केली आहे. त्याला थेट उत्तर देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पक्षाची गरज आहे. भुयेच्या माजी सरपंच राणी पाटील, संतोष चव्हाण, प्रकाश सरनाईक यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मते व्यक्‍त केली. प्रास्ताविक राजू सावंत यांनी केले. स्वागत संतोष कांदेकर यांनी केले.

मेळाव्याला परेश भोसले, राहुल इंगवले, मदन भोसले, भरत पाटील, मिलन मांडवलकर, राजू दबडे आदी उपस्थित होते.


मराठा समाजाच्या राज्य सरकारकडे प्रमुख मागण्या
  
राज्य शासनाने 14 नोव्हेंबरअखेर विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात यावा. अन्यथा 15 नोव्हेंबरनंतर राज्यभर पुन्हा ठोक मोर्चाची सुरुवात केली जाईल.
  
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजासाठीच सीमित असावे. या महामंडळांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजातील गरजू युवक-युवतींना अर्थसहाय्य द्यावे.
  
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी हिवाळी अधिवेशनात 500 कोटींची तरतूद करावी.
  
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह द्यावे. जोपर्यंत ते मिळत नाही, तोपर्यंत वसतिगृह भत्ता म्हणून शहरी विद्यार्थ्यांना 50 हजार आणि निमशहरी विद्यार्थ्यांना 40 हजारांची तरतूद शासनाने करावी. 
  
मराठा क्रांती आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे 15 नोव्हेंबरअखेर सरसकट मागे घ्यावेत.
  
सर्व गड व किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी सरकारने घ्यावी व त्यासाठी आवश्यक जनजागृती करावी. 
  
15 नोव्हेंबरअखेर मराठा आंदोलनामध्ये शहीद झालेल्या बांधवांना सरकारकडून 10 लाखांची मदत व घरातील एका व्यक्‍तीस नोकरी द्यावी. 
  
मराठा समाजातील मुला-मुलींच्या शैक्षणिक सवलतीमध्ये 50 टक्के फीबाबत ठोस निर्णय जाहीर करावा.