Fri, Jul 19, 2019 18:06होमपेज › Kolhapur › स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वज फडकवू देणार नाही

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वज फडकवू देणार नाही

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 1:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कणेरीवाडी (ता. करवीर) येथील मराठा समाजातील विनायक परशराम गुदगी या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. राज्यातील ही 23 वी आत्महत्या आहे. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली नाही. या निषेधार्थ 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंदक्रांत पाटील यांना ध्वज फडकवू देणार नसल्याचा इशारा सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, सोमवारी (दि. 6) दसरा चौकात शहरातील 13 नाल्यांतील प्रदूषित पाण्याचा जलाभिषेक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास घालणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

गुदगीच्या आत्महत्येनंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना दिलीप देसाई म्हणाले, विनायकचे कुटुंब गेली 30 वर्षे कणेरीवाडी येथे राहते. विनायक गोकुळ शिरगाव व दसरा चौकातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होता. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याने तो निराश होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती विनायकचे वडील आणि भावाने दिली. विनायकच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयावर पोलिसांनी दबाब टाकून जबाब नोंदविल्याचे देसाई म्हणाले.

हर्षल सुर्वे म्हणाले, गेली 12 दिवस जिल्ह्यात शांततेत मराठा आरक्षणासाठी आमचा लढा सुरू आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्यामुळे विनायकने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

इंद्रजित सावंत म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 23 जणांनी बलिदान दिलेले आहे. मराठा आरक्षणामध्ये पोलिस खात्याचा वापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी बलिदान दिल्या गेलेल्या प्रकरणावर पोलिस दडपशाहीचा वापर करत आहेत.

सचिन तोडकर म्हणाले, या आत्महत्येस पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असून, त्यांनी राजीनामा द्यावा. गुदगी कुटुंबीयांचा फेरजबाब नोंदवावा. तर स्वप्निल पार्टे यांनी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पत्रकार परिषदेला वसंतराव मुळीक, जयेश कदम, राजू लिंग्रस, कादर मलबारी, उमेश पोवार, फत्तेसिंह सावंत, दुर्गेश लिंग्रस, प्रा. मधुकर पाटील, संदीप पाटील, गणी आजरेकर, जयकुमार शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, भवानीसिंह घोरपडे, संग्रामसिंह निंबाळकर, अमित आडसूळ, अवधूत पाटील, मनोज नरके आदी उपस्थित होते.