Thu, Jul 18, 2019 21:06होमपेज › Kolhapur › आइस्क्रिममधील भेसळीने आरोग्याच्या वाढत्या तक्रारी

आइस्क्रिममधील भेसळीने आरोग्याच्या वाढत्या तक्रारी

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:27AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजीत विनापरवाना आइस्क्रीमचे उत्पादन घेऊन त्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. अशा उत्पादनांसाठी परवाना घेण्याची तसदीही न घेता ते ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहेत. आइस्क्रिमच्या उत्पादनासाठी कोणते घटक किती प्रमाणात वापरण्यात येत आहेत, याची कोणतीही माहिती उत्पादनाच्या वेष्टनावर नसल्याने उत्पादकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. अशा उत्पादनांसाठी घातक रंगांचाही वापर करण्यात येत असूनही अन्न व औषध प्रशासनाचा या प्रकाराकडे कानाडोळा सुरू आहे. 

अलिकडील काही वर्षांत विविध कंपन्यांचे आइस्क्रीम विक्रीसाठी बाजारात आले आहेत. पूर्वी केवळ उन्हाळ्यात खप असलेले हे उत्पादन अलिकडे सर्वच हंगामात खपते. त्यामुळे आइस्क्रीमची बाजारपेठ मोठी आहे. या बाजारपेठेवर डोळा ठेवून इचलकरंजीत काहींनी स्वत:ची उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपन्यांची आइस्क्रीम विकतानाच स्वत:ची उत्पादने ग्राहकांच्या माथी मारण्याचा उद्योग काहींनी चालवला आहे. 

शहरात पूर्वीपासूनच हातगाड्यांवर आइस्क्रीमची विक्री होते. अशी उत्पादने वेष्टनामध्ये असत नाहीत. त्यामुळे अशा उत्पादनांना परवानगी आहे किंवा नाही याचा फारसा विचार केला जात नाही. परंतु काही कंपन्यांनी पॅकबंद उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणली आहेत. कोणत्याही पॅकबंद उत्पादनाचे निकष ठरलेले आहेत. उत्पादन करताना त्यात कोणकोणत्या घटकांचा वापर केला याचा संपूर्ण तपशील उत्पादनाच्या वेष्टनावर नमूद करणे आवश्यक आहे. परंतु असा कोणताही तपशील इचलकरंजीतील आइस्क्रीम उत्पादकांच्या वेष्टनावर आढळत नाही. त्यामुळे अशा उत्पादनांना परवानगी तर आहे की नाही, असा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची तक्रार ग्राहकांतून होत आहे. यातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. घसा खवखवणे, घशात संसर्ग होणे, पोटदुखीसारखा त्रास होणे अशा आरोग्याच्या तक्रारी ग्राहकांना होत आहेत. आइस्क्रीम खाल्ल्यामुळे या तक्रारी उद्भवल्याचे माहीत असूनही कोणीही ग्राहक अशा उत्पादनांविरुद्ध तक्रार करत नसल्याने उत्पादकांचा भेसळ करून फसवणूक करण्याचा उद्योग राजरोसपणे सुरूच आहे. 

अशा उत्पादनांवर उत्पादन घेतल्याची तारीख आणि ते किती दिवसांच्या आत खाण्यास योग्य आहे, याचा कोणताही तपशील नसल्याने रिटेलर्सकडून कालबाह्य उत्पादनेही राजरोसपणे विक्री करण्यात येत आहेत. त्यातूनही ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. 

उत्पादन आकर्षक दिसावे यासाठी त्यामध्ये कृत्रिम रंगांचा बेधडक वापर करण्यात येत आहे. अशा रंगांचाही शरीरावर दुष्परिणाम होत आहे. परंतु अन्न व औषध प्रशासनाने इचलकरंजीतील आइस्क्रीम उत्पादकांना उत्पादनाचा मुक्‍त परवाना दिला आहे की काय, यावर त्यांचे नियंत्रण नाही का असे एक ना अनेक प्रश्‍न ग्राहकांतून करण्यात येत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन अशा बेकायदेशीर उत्पादनांची दखल घेऊन आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवणार का, असा संतप्‍त सवाल करण्यात येत आहे.