Mon, Apr 22, 2019 02:21होमपेज › Kolhapur › महिला पोलिसांवर कामाचा वाढता ताण

महिला पोलिसांवर कामाचा वाढता ताण

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 12:54AMकोल्हापूर : गौरव डोंगरे

पोलिस दलातील नोकरीमध्ये कामाचा ताण, अपुरी झोप, अवेळी जेवण या नित्याच्या बाबी बनल्या आहेत. मुलांचे शिक्षण, घरची जबाबदारी आणि नोकरी सांभाळणे अशा तिहेरी भूमिकेत महिला पोलिसांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. याचा घातक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे तपासणी शिबिरातून पुढे आले आहे. शहरातील पोलिस ठाण्यात काम करणार्‍या 70 टक्के महिला पोलिसांत कॅल्शियम, हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. 

शहरातील चार पोलिस ठाण्याकडे कार्यरत 72 महिला पोलिसांची आरोग्य तपासणी नुकतीच घेतली. यातील 59 महिलांत कॅल्शियमची कमतरता आहे. तर 52 महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. हिमोग्लोबिन 14 ते 18 असावे, मात्र या महिला पोलिसांमध्ये 9 ते 10 प्रमाण आढळून आले.

ड्युटी फस्ट

पोलिसांना तब्बल बारा तास ड्युटी करावी लागते. यासह सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ, मोर्चे, आंदोलने, नेत्यांचे दौरे, कायदा सुव्यवस्था यामुळे जेवण, झोप नसल्याने लठ्ठपणा येतो. याचा परिणाम म्हणजे उच्चरक्‍तदाब, मधुमेह तक्रारींत वाढ होत आहे. ऊन, वारा, पावसात कामे करावी लागत असल्याने अनेक आजारांना नेहमीच तोंड द्यावे लागते. मात्र, अनाठायी काळजीमुळे निर्माण झालेला तणाव जीवघेणा ठरू शकतो. 

आरोग्यावर परिणाम

ड्युटीवर असताना वेळ मिळेल त्यावेळी कुठेही, काहीही खाऊन वेळ मारून नेण्याची वेळ पोलिसांवर येते. परिणामी पुरेसा पोषण आहार घेता येत नाही. बहुतांशी महिलांमध्ये ऑस्टोफेनी या आजाराची लक्षणे दिसून आली. याचा परिणाम म्हणजे थकवा जाणवणे, कार्यक्षमता मंदावणे, मानसिक ताण याला सामोरे जावे लागते.