Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Kolhapur › अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई गुरफटतेय

अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई गुरफटतेय

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:27AMकंदलगाव : प्रकाश पाटील   

शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारील माळावर मोटारीत बसून अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍या दोन डॉक्टरांसह तिघांवर कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून चरसच्या गोळ्या, गांज्याच्या पुड्या असा लाखाचा ऐवज नुकताच जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे  पुन्हा एकदा  उपनगरांमध्ये मादक पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकत असल्याचे निष्पन्न झाले आहे.    तरुण वर्ग अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

दुधासारखे पौष्टिक पदार्थ पिण्याऐवजी मद्य पिणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे असे प्रकार वाढत आहेत. गांज्या, चरस, गर्द पावडर इत्यादी मादक पदार्थांच्या झुरक्याने  अनेक तरुणांच्या दिवसाची सुरुवात होत आहे.आयसोलेशन हॉस्पिटल, राजेंद्रनगर माळ, चित्रनगरी, सृष्टी पार्क, शेंडा पार्क, गिरगाव रोड, कंदलगाव तलाव परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी  तरुणांचा वावर वाढला आहे. 

दररोज एंजटाकरवी मादक पदार्थ विकत  घेऊन  ही तरुणाई झुरक्याची नशा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. मादक पदार्थांच्या सेवनात धुंद असणार्‍या या तरुणांना वेळीच आवरणे गरजेचे आहे . कुटुंबाचा खर्च चालावा, आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी पालकांकडून आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न या व्यसनाधिन तरुणांकडून धुळीस मिळत आहेत.  

नोकरी, व्यवसायामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देता येत नसल्याने मुलाने मागितलेले हवे तेवढे पैसे विचार न करता त्यांना दिले जातात. याचा फायदा घेऊन या मुलांची व्यसनाधिनता वाढत आहे . ड्रग्ज, गांज्याच्या विळख्यात सापडलेली तरुणाई त्यातून बाहेर पडणे कठीण असते; पण आपल्या मुलांच्या संगतीकडे लक्ष ठेवून वेळीच या धोक्यापासून त्यांना आवरणे पालकांचे कर्तव्य आहे.  

ज्या पदार्थाच्या सेवनाने विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, धुंदी येते; यामध्ये अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थांचा अंमली पदार्थांत समावेश होतो . 

खबरदारी घेणे आवश्यक  

अंमली  पदार्थ वेळेवर न मिळाल्याने किंवा महाग झाल्याने युवकांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. आपले जीवन सुंदर आहे, ते एकदाच मिळते. यासंदर्भात  पालकांनी प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी पाल्याला समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्याशी मित्र म्हणून वागणे गरजेचे आहे. काय वाईट आहे, काय चांगले ते त्यांना पटवून देणे आवश्यक आहे. वाईट मित्रापासून दूर ठेवा. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन अथवा औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे.