Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Kolhapur › पंचगंगा पात्राबाहेर

पंचगंगा पात्राबाहेर

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. दिवसभर पावसाने उसंत घेतली असली तरी पाणी पातळीत वाढ होतच राहिल्याने पंचगंगा इशारा पातळीकडे चालली आहे. जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली गेल्याने 30 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. गेल्या 24 तासांत चार तालुक्यांसह धरण परिसरात अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला. जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली. गुरुवारी सकाळी 8 वाजता 19 फुटांवर असलेली पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी 8 वाजता 27.8 फुटांपर्यंत गेली. पाणी पातळी 27  फुटांवर गेल्याने पंचगंगा यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडली. सकाळी सातच्या सुमारास पंचगंगेचे पाणी पंचगंगा विहार मित्र मंडळाच्या बाजूने पात्राबाहेर आले. यानंतर दिवसभरात पातळीत वाढ होतच राहिली. सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पातळी 30 फुटांवर गेली. रात्री 9 वा. ती 30.5 फुटांवर गेली.

पंचगंगेवरील सात बंधारे पाण्याखालीच आहेत. भोगावती नदीवरील खडक कोगे आणि सरकारी कोगे हे बंधारे पाण्याखाली गेल्याने त्यावरील कुडित्रे, बहिरेश्‍वर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या नदीवरील हळदी आणि राशिवडे हे बंधारेही पाण्याखालीच आहेत. कासारी नदीवरील बाजार भोगाव, वाळोली, यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ, तिरपण हे बंधारेही पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. कुंभी नदीवरील शेणवडे व कळे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने या परिसरातील गावांचा थेट संपर्क तुटला आहे.

शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच होती. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत चिकोत्रा वगळता सर्वच धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. राधानगरी (123 मि.मी.), तुळशी (141 मि.मी.), कासारी (150 मि.मी.), कुंभी (180 मि.मी.), पाटगाव (114 मि.मी.), चित्री (102 मि.मी.), घटप्रभा (173 मि.मी.), जांबरे (105 मि.मी.) व कोदे (146 मि.मी.) या धरण परिसरात धुवाँधार पाऊस झाला. वारणा, दूधगंगा, कडवी आणि जंगमहट्टी धरणांच्या क्षेत्रातही अतिवृष्टी झाली.  चिकोत्रा धरण परिसरात केवळ 11 मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाने धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असून, राधानगरीत धरणात 42 टक्के पाणीसाठा झाला. तुळशी 53 टक्के, वारणा धरण 54 टक्के तर दूधगंगा धरण 39 टक्के भरले आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 44.97 मि.मी. असा दमदार पाऊस झाला. गगनबावडा (105.50 मि.मी.), राधानगरी (65.67 मि.मी.), आजरा (72 मि.मी.) व चंदगड (67.76 मि.मी.) या चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. शाहूवाडीत 62.50 मि.मी., भुदरगडमध्ये 45 मि.मी., पन्हाळा तालुक्यात 35.71 मि.मी., कागलमध्ये 32.43 मि.मी.,गडहिंग्लजमध्ये 17.71 मि.मी., करवीरमध्ये 16.36 मि.मी. तर कोल्हापूर शहरात 26 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजअखरे वार्षिक सरासरीच्या 21.84 टक्के पाऊस झाला. जुलै महिन्याच्या तुलनेत पावसाची सरासरी 12.72 मि.मी. पर्यंत गेली आहे. पावसामुळे एस.टी.सेवेवर काहीसा परिणाम झाला आहे. तीन मार्गांवरील वाहतूक रस्ता बंद असल्याच्या कारणास्तव एस.टी.ने अंशतः सेवा बंद केली आहे.