Tue, Jun 18, 2019 21:16होमपेज › Kolhapur › शहरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ

शहरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 10:13PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरात डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.जवाहरनगर, शाहूपुरी, शास्त्रीनगर, कनाननगर, बुद्धगार्डन परिसरात या डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत डेंग्यू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत डेंग्यूचे किरकोळ रुग्ण आढळून येत होते.परंतु, सध्या डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. 

डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने  नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना नुकतेच फैलावर घेतले. सरकारी आणि खासगी दवाखान्यात दाखल होणार्‍या तापाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. डेंग्यूच्या भीतीने ताप आलेले नागरिक भयभीत होत आहेत. ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे समजण्यासाठी डॉक्टरांकडून प्रथम रक्‍ताची तपासणी केली जात आहे. त्यामुळे   लॅबमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे. 

मार्च आणि मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या साचलेल्या  पाण्यामुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डास उत्पत्तीची ठिकाणे नागरिकांनी नष्ट करावीत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. डेंग्यू हा विषाणू जन्य रोग आहे. हा रोग ‘एडिस’ डास चावल्याने होतो. गटार, कचरा, टायरी अथवा ड्रममध्ये साचलेल्या पाण्यात त्यांची उत्पती होते. उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये एडिस डासांचा फैलाव अधिक वाढतो.   डास चावल्यानंतरचे सुरुवातीचे तीन दिवस शरीरामध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यानंतर ताप येणे, डोळे लाल होणे, अंग गुलाबी पडणे, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसू लागतात. तसेच ज्या लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्‍ती कमी आहे. त्यांना डेंग्यूची लागण लगेच होते. शिवाय लहान मुले, आजारी व्यक्‍तींना या आजाराची तत्काळ लागण होण्याची शक्यता असते. यामुळे या आजाराबाबत वेळीच खबरदारी घेणे गरजेचे 
आहे.

डेंग्यूची लक्षणे 

जास्त ताप, डोकेदुखीसह स्नायूदुखी आणि उलट्या होणे
अशक्‍तपणा,भूक मंदावणे, तहान लागणे
त्वचेचा रंग गुलाबी होणे
गळ्याला सूज येणे
चिडचिडेपणा वाढणे
नाक अथवा हिरडीतून रक्‍त येणे
शरीरात रक्‍ताची कमतरता भासणे

डास उत्पत्तीची ठिकाणे...

उघड्यावर साठवलेले स्वच्छ पाणी
रांजण, टायरी, नारळाच्या करवंट्या, डबे, रिकाम्या कुंड्या

डेंग्यूपासून बचाव... 

ताप आल्यास त्वरित उपचार करून घेणे
उघड्यावरील पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडणे
परिसर स्वच्छ ठेवणे
कीटकनाशक फवारणे 
झोपताना मच्छरदाणी वापरणे