होमपेज › Kolhapur › मुसळधार पावसाने नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ

मुसळधार पावसाने नदी-नाल्यांच्या पातळीत वाढमुसळधार पावसाने नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 16 2018 10:26PMहातकणंगले : प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यामध्ये संततधार पाऊस पडत आहे. हा पाऊस सरासरी 109 मिलिमीटर झाला असून, आजअखेर 191 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, चांदोली धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे वारणा नदीची पातळी कमालीची वाढली आहे. या पावसामुळे विहिरींची पातळी वाढली असून खरीप पिके गारठली आहेत तर उसाच्या सर्‍या पाण्याने भरल्या आहेत. तालुका प्रशासनाने नदी काठच्या 19 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हातकणंगले तालुक्यामध्ये दोन दिवस पावसाने कमालीचा जोर धरला असून सोमवारी सकाळपासून दिवसभर संततधार सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील पंचगंगा, वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अद्याप संभाव्य पूर परिस्थिती नसली तरी तालुका प्रशासनाने निलेवाडी, पारगाव, चावरे, घुणकी, भादोले, लाटवडे, भेंडवडे, खोची, वाठार तर्फ उसगांव, कुंभोज, हिंगणगाव, शिरोली (पुलाची), हालोंडी, इंगळी, रुई, चंदूर, रांगोळी, हुपरी, इचलकरंजी या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी पाण्याने सांडवा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आज सकाळी 10 च्या सुमारात धरणाचे चारही दरवाजे 0.50 मीटर उघडून सुमारे 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून 592 व उच्चस्तर द्वारातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सर्व मिळून मिळून 3492 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

मुसळधार पाऊस त्यातच धरणातून सुरू केलेला विसर्ग वीजनिर्मिती केंद्रातून येणारे पाणी यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासना मार्फत देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 45 दिवस म्हणजे दीड महिना आधीच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 810 मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण 1324 मिलिमीटर इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 514 मिलिमीटर पाऊस अधिक बरसला आहे. 

कागल तालुक्यात अनेक बंधार्‍यांवर पाणी 

कागल : प्रतिनिधी

गेल्या चार - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.दूधगंगा आणि वेदगंगा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक बंद झाली असून, नागरिक पर्यायी मार्गाचा अवलंब करून प्रवास करीत आहेत. जोरदार पावसामुळे कागल शहरातील सोमवारी आठवडी बाजार विस्कळीत झाला होता. दरम्यान, या पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात येत आहेत.

दूधगंगा आणि वेदगंगा नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. नदी काठावरील ऊस, सोयाबीन, भात पीक पाण्याखाली गेले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी इतरत्र पसरत आहे. दूधगंगा नदीवरील बाचणी पुलावर पाणी आल्यामुळे कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. बामणी - खेबवडे या पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक सुरू झाली आहे. कागल ते मुरगूड दरम्यानची वाहतूक देखील बंद झाली आहे. या मार्गावर निढोरी जवळ नदीचे पाणी आल्यामुळे मुरगूडला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. दूधगंगा नदीवरील वंदूर - सिध्दनेर्ली दरम्यानचा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वंदूर, सुळगाव कडून कागल - निढोरी मार्गावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तर कागल ते सुळकूड दरम्यान सुळकूड येथे असलेल्या बंधार्‍यावर पाणी आले आहे. त्यामुळे या बंधार्‍यावरून किरकोळ स्वरूपात सुरू असणारी वाहतूक आता बंद झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे सुळकूडला जाण्यासाठी कोगनोळी मार्गे वाहतूक सुरू झाली आहे.

इचलकरंजी जवळील जुन्या पुलावर पाणी आल्यामुळे कागल ते इचलकरंजी मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. बोरगाव मार्गे इचलकरंजी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कागलहून इचलकरंजीला जाणार्‍या बसेस हुपरीपर्यंत सोडल्या जात आहेत. तेथून बोरगाव मार्गे बसेस सोडल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.दरम्यान, बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवत वाहन चालकांना पुढे जावे लागत आहे. कागल तालुक्यातील काही रस्त्यांवरील खड्डे मुजविण्यासाठी शासनाकडून उन्हाळ्याच्या अखेरला निधी आला होता, त्यावेळी भरण्यात आलेले खड्डे आता पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी खर्च केलेला निधी पाण्यात गेला आहे. काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चिखली - कौलगे रस्ता पाण्यात !

नानीबाई चिखली : वार्ताहर

वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नानीबाई चिखली ते कौलगे  रस्त्यावर पाणी आले आहे .हा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चिखलीचा काईंत अड्डा,  भोसले वस्ती, पवार वस्ती, काईंगडे अड्ड्यावरील शेतकर्‍यांना गावाशी संपर्क करणे अवघड झाले आहे.

दूध घालण्यासाठी सकाळ, संध्याकाळी गावात यावे लागते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बससेवा ठप्प झाल्याने कुचंबणा होते आहे. कौलगेच्या  अनेकांना चिखलीला बँकेसह इतर कामासाठी जाण्यासाठी हमिदवाडा कारखाना मार्गे जावे लागत आहे. चिखली -  कौलगे  रस्त्याला पर्यायी रस्ता असणार्‍या तेली पाणंद रस्त्याचे काम गेली वीस वर्षे रखडले आहे, तो रस्ता आज कार्यरत असता तर अनेकांची गैरसोय झाली नसती. पावसाची संततधार पाहता हा रस्ता चार ते पाच दिवस पाण्याखाली राहण्याची शक्यता आहे. तसेच  चिखली बंधारा पाण्याखाली गेल्याने चिखलीहून कुर्ली कागल, कोल्हापूरकडे जाणार्‍यांचीही गैरसोय होत आहे, वाई मार्गे सातारा म्हणजे यमगर्णी, निपाणी मार्गे प्रवास करावा लागत आहे.

आजर्‍यातील अतिवृष्टीने साळगाव, किटवडे बंधाराही पाण्याखाली

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरासह तालुक्यात  सोमवारी अतिवृष्टी झाली. हिरण्यकेशी नदी धोक्याच्या पातळीबाहेरून वाहू लागली असून तालुकावासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा सलग तिसर्‍या दिवशीही पाण्याखालीच आहे. तर किटवडे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. पावसाबरोबर सोसाट्याच्या वार्‍यामुळे ठिकठिकाणी पन्नासवर घरांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळली आहेत. शाळा, महाविद्यालयांना अघोषित बंदचे स्वरूप आले. धरणक्षेत्रातील जोरदार पावसामुळे तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्प 74 टक्के भरले आहे. नद्यांबरोबर ओढेही तुडुंब भरून वाहत आहेत. हिरण्यकेशी नदीने उग्ररूप धारण केल्याने  ऊस, भाताचे प्रचंड नुकसान झाले असून, काही ठिकाणी लावणीसाठी ठेवलेले रोपे देखील वाहून गेली आहेत.

आजरा मंडलमध्ये 70 मि.मी., गवसे मंडलमध्ये 144 मि.मी. तर मलिग्रे येथे 50 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 29 मि.मी. इतका पाऊस उत्तूर मंडलमध्ये झाला आहे. सरासरी 73.25 मि.मी. इतका तालुक्यात पाऊस झाला आहे. पावसामुळे खेडगे, सुळेरान, पारपोलीसह पश्‍चिम भागात घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आजरा शहर व परिसरातील घराच्या भिंती कोसळणे, झाडे कोसळणे असे प्रकार घडू लागले आहेत. धनगरवाडी व एरंडोळ धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून खानापूर धरण 64 टक्के भरले असून धरणात 19 एमसीएफटी पाणीसाठा झाला आहे. चित्री धरण परिसरात 157 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजअखेर 1566 मि.मी. पाऊस झाला आहे. चित्री धरणात 1403 एमसीएफटी पाणीसाठा झाला असून 74 टक्के धरण भरले आहे. हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.