Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Kolhapur › जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:46PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मागील हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये सरासरी एक ते दीड फुटाने वाढ झाली आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या भूजल पातळीत मात्र सुमारे दीड फुटाची घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. 

करवीर तालुक्याच्या भूजल पातळीत सर्वाधिक म्हणजे जवळपास पाऊण मीटरने वाढ झाली आहे, तर भुदरगड तालुक्याच्या पातळीत केवळ दोन सेंटिमीटर इतकी नाममात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे 1,772 मिलिमीटर इतके आहे. मात्र, जिल्ह्याच्या पर्जन्यमानात गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीची घट झालेली दिसून येत आहे. सन 2015-16 च्या पर्जन्य हंगामात तर जिल्ह्यात केवळ सरासरी 48 टक्के पावसाची नोंद झाली होती. मागील हंगामाच्या सुरुवातीला तर जिल्ह्याच्या निम्म्याहून अधिक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, हंगामाच्या अखेरच्या सत्रातील सप्टेेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने तुफानी हजेरी लावली होती. या दोनच महिन्यात जिल्ह्यात सरासरी 1,389 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या जवळपास 78 टक्के पाऊस या काळात झाला होता.

मागील वर्षी झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या भूजल पातळीतही समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. करवीर, चंदगड, शाहूवाडी आणि शिरोळ या तालुक्यांत भूजल पातळी जवळपास दीड फुटाने वाढली आहे, तर अन्य तालुक्यांमधील भूजल पातळीत एक फुटाच्या आसपास वाढ झाली आहे.