Tue, Jun 18, 2019 20:55होमपेज › Kolhapur › आता तरी कर्नाटक प्रशासन जागे होणार?

आता तरी कर्नाटक प्रशासन जागे होणार?

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:32AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

काळभैरी मंदिर ते हडलगे तिट्टा रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता डर्टट्रॅक बनला असल्याचे सचित्र वृत्त रविवारी दै.‘पुढारी’त सविस्तर प्रसिद्ध झाले होते. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता सर्वच प्रकारच्या वाहतुकीस धोकादायक ठरत असून, कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट केले होते. रविवारी याच खड्ड्यांतून वाट काढताना कर्नाटक आगाराचीच बस चरीत घसरल्याने हा रस्ता धोकादायक असल्याचा प्रत्यय आला असून, केवळ दैव बलवत्तर म्हणून या बसमधील प्रवाशांच्या जीवाचा धोका टळला आहे. त्यामुळे आता तरी कर्नाटक प्रशासनाला जाग येणार का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गडहिंग्लजहून कोल्हापूरला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून गडहिंग्लज-काळभैरीमार्गे रस्ता आहे. या रस्त्यावरून गडहिंग्लज, आजरा व चंदगड आगाराच्या 100 हून अधिक बसेसच्या दिवसभरात फेर्‍या होतात. काळभैरी मंदिरापासून हडलगे तिट्ट्यापर्यंतचा सुमारे एक कि. मी. अंतराच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. कर्नाटक हद्दीत असलेला हा रस्ता कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रालाच सर्वाधिक उपयोग ठरत असल्याने कर्नाटक प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सध्या पावलागणिक खड्डे पडले असून यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

महाराष्ट्रातील तिन्ही आगारांच्या बसेससह खासगी वाहतूक या मार्गावरून होते. याशिवाय जवळच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काळभैरवाचे मंदिर आहे. त्यामुळे कागलसह, भुदरगड आजरा तालुक्यातील भाविकांना हडलगे तिट्टामार्गे मंदिराकडे यावे लागते. मात्र, रस्ता दुरवस्थेमुळे सार्‍यांनाच त्रासाचे ठरत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांची खोली जास्त असल्याने चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले असून, रस्त्याबाबत वाहनधारकांसह नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक उपयोगी असणार्‍या या रस्त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत कर्नाटक सरकारने या रस्त्याला ‘जैसे थे’च ठेवले आहे.

रविवारी याच रस्त्यावरून जात असलेली कर्नाटक आगाराची एस.टी. बस खड्डा चुकविण्याच्या नादात बाजूला असलेल्या चरीत घसरली. प्रसंगावधान राखून चालकाने बस नियंत्रणात आणली. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला असला तरी महाराष्ट्रातील प्रवाशांच्या जीवाशी होत असलेला खेळ केव्हा थांबणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. आता तरी कर्नाटक प्रशासनाला जाग येऊन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार का, हे पाहावे लागणार आहे.

दै. ‘पुढारी’तील वृत्ताची चर्चा...

हडलगे तिट्टा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत रविवारीच दै.‘पुढारी’ने सविस्तरपणे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सर्वच प्रकारच्या वाहनांना धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले होते. याच दिवशी कर्नाटक बस चरीत घसरली. या ठिकाणी दै.‘पुढारी’च्या वृत्ताचीच चर्चा प्रवाशांसह इतर वाहनधारकांत होत होती.