होमपेज › Kolhapur › होय... आम्ही लाचेला सोकावलोय !

होय... आम्ही लाचेला सोकावलोय !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोणत्याही सरकारी कार्यालयात गेला की ‘लाच घेणे आणि देणे’ हा गुन्हा आहे, असा फलक  दिमाखात झळकताना दिसतो; पण या फलकासमोरच लाच द्या आणि काम करून घ्या, असं निर्लज्जपणे सांगणारी यंत्रणा मुर्दाडपणे काम करताना दिसते. अख्खीच्या अख्खी कार्यालयेच लाचेसाठी समांतर यंत्रणा राबवत असल्याचे नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रकरणावरून दिसत आहे. याचाच अर्थ ‘होय! आम्ही लाचेला सोकावलोय’ अशीच बहुतेक सरकारी बाबूंची कामाची पद्धत असल्याचे स्पष्ट होते. अशी लाचखोरीची समांतर यंत्रणा म्हणजे संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे. 

पन्हाळा दुय्यम निबंधकासह सहाजण लाच घेताना रंगेहाथ सापडतात म्हणजे भ्रष्टाचाराची ही कीड आता रोगात रूपांतरित झाली आहे. वरपासून खालपर्यंत लाचेसाठीच काम करायचे अशा पद्धतीने सरकारी यंत्रणा सर्वसामान्यांना नाडू लागल्या आहेत. गेल्याच आठवड्यात सांगली व कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने महिला व बालविकासच्या तीन अधिकार्‍यांना लाच घेताना जेरबंद केले. महसूलमध्ये तर ‘हात दाखवा आणि काम करून घ्या’ अशी पद्धत  बहुतांश कार्यालयात रुजली आहे. पोलिसांच्या हप्तेखोरीला वेसन घालण्यास अद्याप कोणाही प्रामाणिक आणि धडाडीच्या अधिकार्‍याला यश आलेले नाही. यापूर्वी लाच घेताना एखाद-दुसरा जाळ्यात सापडत होता. हे प्रमाणही मोठे होतेच.

पण, अलीकडे आठवड्यात घडलेली उदाहरणे म्हणजे सगळी सरकारी कार्यालयेच लाचेसाठी काम करतात या शंकेला आणि कुजबुजीला बळ देणारी आहेत. सगळेच सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच घेतात असे अजिबात नाही. कारण आपल्या नोकरीशी इमान राखणारी आणि स्वत्व  जपणार्‍यांची संख्यासुद्धा चांगली आहे. परंतु, अलीकडच्या काळात अशा प्रामाणिक अधिकार्‍यांना जाणीवपूर्वक साईड पोस्टिंगला टाकून त्यांचा पत्ता परस्पर कट करणार्‍या यंत्रणा वेगाने काम करू लागल्या आहेत. त्यामुळे दिवस, आठवडा आणि महिन्याचे कलेक्शन अशी काही सरकारी कार्यालयांची कामाची पध्दत रुढ झाली आहे. महसूलमध्ये तलाठी, सर्कलपासून आणखी वरच्या अधिकार्‍यांपर्यंत श्रेणीनुसार लाचेची रक्‍कम ठरली आहे.

आरटीओ, बांधकाम, महावितरण, वनविभाग असं कुठलेच कार्यालय नाही की जेथे लाच घेतली जात नाही. प्रत्येक टेबलचे आणि माणसांचे दर ठरलेले आहेत. ‘आम्ही विकायला तयार आहोत, तुम्ही फक्‍त बोली  लावा’ असाच सारा मामला दिसू लागला आहे. बरं, आता पाचवा, सहावा आणि सातव्या वेतनाने शिपायापासून अधिकार्‍यांचे पगार गलेलठ्ठ झालेत. पोटापाण्यासाठी लाच घ्यावी, अशी काही स्थिती नाही. तरीही लाच घेणारे आणि देणार्‍यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. लाच घेणार्‍यांना प्रतिष्ठा मिळाली की काही प्रामाणिक अधिकार्‍यांचेही हात-पाय हलायला सुरू होते. पण, लाच घेताना सापडलेल्यांच्यावर झालेल्या  कारवाईचा या डळमळणार्‍या प्रामाणिक अधिकार्‍यांनी अभ्यास केला.

जुने ते सोने

मटका आणि गुटखा या दोन्ही बेकायदेशीर गोष्टी जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. या दोन्हीसाठी कलेक्शन करणारे ठराविक चेहरे पोलिस दलात ‘कलेक्टर’ म्हणून ओळखले जातात. या कलेक्टरांशिवाय अधिकार्‍यांचे पानही हालत नाही. पोलिसांच्या एका विभागात  तथाकथीत कलेक्टरपदासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती. मात्र जूने ते सोने म्हणत वरिष्ठांनी  बदल केला नाही. याबाबतची चर्चा जोरदार सुरू होती. 

खासगी क्षेत्रातही ‘लुटमारी’

खासगी क्षेत्रातही लाचेच्या माध्यमातून लुटमारी सुरु आहे. विशेषत: खासगी उद्योगांतील काही पर्चेस अधिकारी किंवा क्वालिटी कंट्रोलर ही या लुटमारीची केंद्रे बनली आहेत. ही मंडळी खरेदी आणि माल (वस्तू) ठरवत असल्याने अशांना खूश केल्याशिवाय कामेच होत नसल्याचे चित्र आहे. 

‘लाच’ नावाची इंडस्ट्री

दररोज लाखोंची उलाढाल ‘लाच’ नावाच्या इंडस्ट्रीत होते. यासाठी दलाल आहेत तसेच ही लाचेची रक्‍कम कुठे आणि कशी मुरवायची याबाबतचे गुंतवणूकदारही हात जोडून दिमतीला सज्ज आहेत. सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामुळे लाच घेणार्‍यांविरोधात पुरावे सहज गोळा करता येऊ लागले आहे. तसेच लाच देणारेही काम झाल्यावर मी अमक्याला एवढे पैसे दिलेत, असं सहज सांगत सुटले आहेत. अशा लाचखोरांच्या दृष्टीने धोक्याच्या काळातही लाच घेणारे सुसाट सुटले आहेत.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Government Offices, bribe,


  •