Sun, Jun 16, 2019 13:04
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › प्रतापरावांची मातृऋणमुक्‍ती

प्रतापरावांची मातृऋणमुक्‍ती

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 12:41AM
कसबा नूलच्या सुकन्येचे म्हणजे प्रतापरावांसारख्या प्रतापी पुत्राला जन्म देणार्‍या ‘मातोश्री इंदिरादेवींचेच’ नाव महाविद्यालयाला देण्याचा निर्णय घेतला. ही खरोखरच समाधानकारक गोष्ट आहे. महाविद्यालयाला केवळ अनुमती मिळवून देऊन प्रतापराव थांबलेले नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करून या महाविद्यालयासाठी सर्व सोयींनीयुक्‍त सुसज्ज इमारत आणि प्रयोगशाळाही उभी करून देण्याची दानत त्यांनी दाखविलेली आहे. एकप्रकारे आपले स्वतःचे ‘मातृऋण’ फारीक करण्याचा किंवा अंशतः परतफेड करण्याचा हा प्रकार आहे. यातून समाजातील सर्व घटकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. 

एखाद्या घराण्यात, एखाद्या कालखंडात, एखादी कर्तबगार व्यक्‍ती, जन्माला येते आणि स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून काही गोष्टी साध्य करते. अशा एखाद्या कर्तबगार व्यक्‍तीने केलेले साध्य त्याच्या पुढच्या पिढीने समजून घेऊन त्यामध्ये भर घालण्याचे साधन म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागते.

कर्तबगार जाधवांच्या तीन पिढ्या

पाठीमागच्या दोन पिढ्यांनी प्राप्‍त केलेले किंवा सिद्ध केलेले साध्य टिकवून ठेवण्याचे व त्यात भर घालण्याचे काम तिसर्‍या पिढीला करावे लागते. ज्या घराण्यामध्ये अशा सलग तीन पिढ्या कर्तृत्ववान निघतात. ती घराणी इतिहासामध्ये कायमची नोंदली जातात. अशी आजपर्यंतच्या मानवी इतिहासाची साक्ष आहे. डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे घराणे यापैकीच एक आहे.

प्रतापरावांचे आदर्शवत काम...

प्रतापराव जाधवांच्या कर्तबगार कारकिर्दीविषयी खूप काही लिहिता येईल, आणि लिहिले जाईल. त्यांच्या जीवनातील त्यांचे विचार आणि व्यक्‍तिमत्त्व आणि प्रताप स्पष्ट करणार्‍या काही प्रासंगिक घटना नमूद करायच्या झाल्या तर त्यामध्ये सीमेवर लढणार्‍या काश्मीर खोर्‍यातील भारतीय सैनिकांसाठी सर्व सोयींनीयुक्‍त असे रुग्णालय निर्माण करणे, ही खरोखरच अभिनव कल्पना होती. जे कार्य शासनाने त्यापूर्वीच करणे गरजेचे होते, ते कार्य ‘पुढारी’कारांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या हिमतीने आणि समाजाच्या मदतीने साकार करून दाखविले आहे. आपल्या वडिलांनी इतके मोठे कार्यक्षेत्र निर्माण करून दिलेले असताना आयत्या पिठाच्या रांगोळी काढत बसण्याऐवजी सामाजिक बांधिलकी मान्य करून असे स्वप्न पाहणे आणि स्वतःच्या आणि समाजाच्या जोरावर साकार करून दाखविणे हे खरोखरच भारतीय वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासातील दुर्मीळ उदाहरण मानावे लागेल. 

प्रतापरावांचे तसे अनेक प्रताप सांगण्यासारखे आहेत. कोल्हापरचे विमानतळ असो, किंवा जकातीसंबंधीचा लढा असो, खंडपीठाची मागणी असो, त्यामध्ये ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’कारांनी पुढाकार घेतला नाही, असे सांगताच येणार नाही. अर्थात त्यांना हा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्‍त झालेला आहे. आणि त्यांनी तो जाणीवपूर्वक टिकवून वाढविलेला आहे. याचे आमच्या भागातील उल्‍लेखनीय उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटीत होत असलेले ‘इंदिरादेवी ज्यु. कॉलेज काा नूल’ (ता. गडहिंग्लज) येथील ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या सेवाभावी संस्थेने 1956 साली जो ज्ञानदानाचा यज्ञ सुरू केला, त्याचे हे ज्युनियर कॉलेज म्हणजे विकसित रूपांतर. ही संस्था ‘शंकराप्पा नडदगल्‍ली’ आणि स्वातंत्र्यसेनानी ‘अनंतराव तेलवेकर, आनंदराव चव्हाण, अंबालाल शहा, डॉ. नाईकवाडे, आबासाहेब चौगुले’, व त्यांच्या तत्कालीन सहकार्‍यांनी निर्माण केली. आणि अतिशय उत्तमरीतीने चालविली. त्याचे आम्ही अनेकजण लाभधारक आहोत. याच संस्थेने ‘कौलगे’ येथे अशीच दुसरी शाळा सुरू केली. त्यामुळेच आमच्या काही जणांच्या आयुष्यात साक्षरतेची पहाट उगवली. जर ही शाळा 1960 साली ‘कौलगेला’ या मंडळींनी निर्माण केली नसती, तर हा लेख लिहिणारा लेखक म्हणजे मी स्वतः ऊस तोडायला फडात किंवा हमाली करायला कोल्हापूरला गेलो असतो. कारण त्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता.

पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आमच्या घरात पहिले साक्षर होण्याचा मान या संस्थेमुळे प्राप्‍त झाला आहे. त्यामुळे ताठमानेने त्याच क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. आमचे मित्र ‘प्रतापराव जाधवांनी’ नूल सारख्या गावात कॉलेज सुरू करण्यासाठी त्यांच्या नावाप्रमाणे जो पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. कारण ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ ही आमची मातृशिक्षण संस्था आहे. मातेचे आणि मातीचे उपकार पूर्णपणे कधीच फेडता येत नसतात. तरीही कर्तबगार पुत्र अंशतः का असेना आपले मातृऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. याचा पुरावा म्हणजे प्रतापराव जाधव आणि त्यांनी नूलमध्ये सुरू केलेले हे कॉलेज आहे. अर्थात नूलमध्ये कॉलेज सुरू करण्यात प्रतापरावांनी पुढाकार घेतला. याचा अर्थ त्यांनी आमच्यावर फार मोठी मेहरबानी केली, असेही नाही. आमचा त्यांच्यावर आणि त्यांचा आमच्यावर असलेला हक्‍क त्यांनी कर्तव्य भावनेने सिद्ध केला असाच याचा अर्थ आहे. अर्थात कर्तव्याची ही भावना कोणीही न सांगता त्यांनी पार पाडली. त्यासाठी त्यांचे केवळ अभिनंदनच नव्हे, तर त्यांना आम्ही ‘अभिवंदन’ करतो. 

ऐतिहासिक तेलवेकर देसाई घराणे

प्रतापरावांनी आपल्या मातृभूमीमध्ये जन्माला येणार्‍या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी पुढाकार घेतला आणि कॉलेजची निर्मिती केली. याचे कारण त्यांच्या स्वतःच्या निर्मितीमध्ये म्हणजेच ‘प्रतापराव जाधवांना’ हे जग दाखविण्यासाठी जन्माला घालण्यामध्ये नूल गावचा पन्‍नास टक्के वाटा आहे. तो त्यांनाच काय कोणालाही मान्य करणे आवश्यक आहे. कसबा नूल ही ‘इंदिरादेवी जाधवांची’ जन्मभूमी आहे. या गावातील ‘तेलवेकर देसाई’ या आडनावांच्या ऐतिहासिक घराण्यामध्ये ‘इंदिरादेवीं’चा जन्म झाला. प्रतापराव जाधवांच्याविषयी भावनांची अभिव्यक्‍ती करीत असताना हा ऐतिहासिक प्रसंग एवढ्यासाठी उल्‍लेखीत केलेला आहे की, प्रतापराव जाधवांच्या व्यक्‍तिमत्त्वामध्ये समाजसेवेची प्रेरणा नेमकी कोठून आली, हे स्पष्ट व्हावे. त्यांच्या या उक्‍ती आणि कृतीमध्ये ‘गगनगडावरील जाधव’ घराण्याचे जसे पिढ्यान्पिढ्यांचे संस्कार आहेत, तसेच ‘सामानगडावरील तेलवेकर’ घराण्याचेही तितकेच महत्त्वाचे संस्कारदान आहे, हे स्पष्ट व्हावे.

मातृऋणमुक्‍ती

प्रतापराव जाधवांनी आपले वजन वापरून आपल्या मातृभूमीत जन्माला येणार्‍या पुढच्या पिढ्यांची शैक्षणिक सोय निर्माण करण्यासाठी या उद्घाटन समारंभाला हजर असणार्‍या महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांकडे खास विनंती केली आणि ‘नामदार तावडे साहेबांनीही’ महाराष्ट्रातील या ज्येष्ठ पत्रकाराच्या शब्दाला मान देऊन एक मिनिटाच्या आत खास बाब म्हणून ज्युनिअर कॉलेजला परवानगी दिली. संस्थेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी आणि या घटनेला साक्षीदार असणार्‍यांनी कृतज्ञतेच्या भावनेने कसबा नूलच्या सुकन्येचे म्हणजे प्रतापरावांसारख्या प्रतापी पुत्राला जन्म देणार्‍या ‘मातोश्री इंदिरादेवींचेच’ नाव देण्याचा निर्णय घेतला. ही खरोखच समाधानकारक गोष्ट आहे. यासाठी विद्यमान अध्यक्ष नडदगल्‍ली’ आणि त्यांचे सहकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

या महाविद्यालयाला केवळ अनुमती मिळवून देऊन प्रतापराव थांबलेले नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करून या महाविद्यालयासाठी सर्व सोयींनीयुक्‍त सुसज्ज इमारत आणि प्रयोगशाळाही उभी करून देण्याची दानत त्यांनी दाखविलेली आहे. एकप्रकारे आपले स्वतःचे ‘मातृऋण’ फारीक करण्याचा किंवा अंशतः परतफेड करण्याचा हा प्रकार आहे. यातून समाजातील सर्व घटकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. 

प्रा. किसनराव कुराडे  अध्यक्ष, शिवराज विद्या संकुल, गडहिंग्लज.