Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Kolhapur › सामाजिक कामांसाठी निवडून दिल्याचे भान ठेवा : चंद्रकांत पाटील 

सामाजिक कामांसाठी निवडून दिल्याचे भान ठेवा : चंद्रकांत पाटील 

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 17 2018 11:03PMकोल्हापूर : प्रतिनिधी

लोकांनी सामाजिक कामांसाठी विश्‍वासाने तुम्हाला निवडून दिले आहे. याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवावे. तुम्ही एजंट नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकप्रतिनिधींना सुनावले. जिल्हा परिषदेतील रस्ते दुरुस्ती प्रगती नियंत्रण कक्षाचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिप अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, अवजड वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते खराब झाले आहेत. त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा केला. राज्यातील साधारणपणे दोन लाख वीस हजार किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यापैकी 30 हजार किलोमीटरची कामे मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरू आहेत. ही सर्व कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, यासाठी सर्वांनी दक्ष असले पाहिजे. त्यासाठीच रस्ते दुरुस्ती प्रगती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. चांगल्या दर्जाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी प्रोत्साहनात्मक बक्षीस ठेवण्यात आले आहे आणि जे काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पीडब्ल्युडीमधील आतापर्यंत 200 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांनी आपल्या प्रास्ताविकात नियंत्रण कक्षाची तसेच रस्ते दुरुस्तीसाठी आलेल्या निधीची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी साडेबारा कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून 185 गावातील रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. या कक्षाद्वारे जिल्ह्यातील सुमारे 650 किलो मिटर लांबीच्या रस्त्यांबाबतची देखभाल या कक्षातून होणार आहे. या कामाची दोन वर्ष जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांचेही यावेळी भाषण झाले. 

कार्यक्रमास आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, पक्षप्रतोद विजय भोजे, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप उपस्थित होते. 

57 हजार किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त 

राज्यातील रस्ते विकासावर सर्वांधिक लक्ष केंद्रित केले असून गेल्यावर्षी राज्यातील 57 हजार किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिली.