गडहिंग्लज तालुक्यामध्ये नूलसारख्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मानाचा मुजरा ठरण्यासारखा प्रसंग घडला असून, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहकार्यातून इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स व सायन्सच्या नूतन इमारतीचा शुभारंभ होत असून छोट्या मंदिरापासून सुरुवात झालेली ही शाळा आज अतिशय देखण्या व सुसज्ज अशा इमारतीमध्ये जात आहे. राज्याचे शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानिमित्त चार शब्द...
गडहिंग्लज येथे महाराणी राधाबाई तथा एम. आर. हायस्कूल आणि संकेश्वर येथे एस. डी हायस्कूल या स्वातंत्र्यपूर्व काळातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वगळता, सुमारे शंभर कि. मी.च्या परिघात दुसरी माध्यमिक शाळा नव्हती. ती सुरू करण्याचा पराक्रम नूल येथील लोकांनी केला. हा त्याकाळचा विचार करता आश्चर्यकारक घटना होती. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ या युक्तीप्रमाणे नूलमधील काही लोकांना आपल्या गावात माध्यमिक शाळा असावी, असे वाटले. यामागे उच्च आणि व्यापक विचारांची बैठक होती. कै. अनंतराव तेलवेकर, कै. आनंदराव चव्हाण,
कै. दिनकरराव शिंदे, कै. भि. आ. चौगुले गुरूजी, डॉ. लिंगाप्पा नाईकवाडी, अंबालाल शहा, शंकराप्पा नडगदल्ली, गुरूसिद्धाप्पा वाली, पराप्पा आरबोळे, संबय्या हिरेमठ, महालिंगाप्पा नडगदल्ली, बाळासाहेब देसाई, बसगोंडा पाटील ही सगळीच मंडळी सामाजिक कार्यात पुढे होती.
शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय, राजकारण, व्यापार हे सगळे करताना स्वातंत्र्य चळवळीला रसद पुरविण्याचे कामही त्यांच्याकडून सुरू होते. गांधी विचारांचा मोठा पगडा या मंडळींवर होता. त्यामुळे बहिष्कार, असहकार, चलेजाव, सत्याग्रह यासारख्या महात्मा गांधीजींच्या सर्वत्र आदेशांना या लोकांनी उचलून धरले होते. त्यामुळे इंग्रजांच्या डोकेदुखीत भर घालणारे नूल गाव हे लक्षवेधी ठरले होते. स्वातंत्र्यसैनिकांचे गाव ही बिरूदावली मोठ्या सन्मानाने या गावाला प्राप्त झाली. या सर्व व्यक्तींमध्ये काजव्याप्रमाणे ठळक कार्य करणारी एक विशेष व्यक्ती होती, ती म्हणजे कै. ईश्वराप्पाण्णा शंकराप्पा नडगदल्ली. सामानगडावरून परागंदा होऊन आसपासच्या खेड्यांतून स्थायिक झालेल्या अनेक कुटुंबीयांपैकी नडगदल्ली हे कुटुंब कसबा नूल येथे स्थायिक झाले.
21 फेबु्रवारी 1915 मध्ये ईश्वराप्पाण्णाचा जन्म झाला. वडिलांचा परंपरागत शेती व तंबाखूचा व्यापार सांभाळत त्यांनी प्राथमिक शिक्षण नूल येथेच पूर्ण केले. एकीकडे कर्नाटक राज्याची हद्द तर दुसरीकडे पूल नसलेली हिरण्यकेशी नदी. अशा नैसर्गिक कचाट्यात सापडलेल्या नूल गावाला गावातील प्राथमिक शाळेमधून घेतलेल्या शिक्षणावरच थांबावे लागत होते. व्यापारानिमित्ताने नडगदल्ली कुटुंबीयांचा गडहिंग्लज, संकेश्वर आणि निपाणी या गावांशी संपर्क आला. तेथील माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण देणार्या संस्था आणि त्याचा लाभ घेऊन उच्च पदावर पोहोचणार्या व्यक्ती यांची माहिती कै. ईश्वराप्पाण्णांना होती. त्यामुळे शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन वरील सर्व सहकार्यांना आपल्या पेठ गल्लीतील घरी एकत्र करून माध्यमिक शाळा काढण्याची कल्पना व त्यातूनच शिक्षण प्रसारक मंडळाचा जन्म या गोष्टी पार पडल्या.
या संस्थेमार्फत 15 जून 1956 रोजी न्यू इंग्लिश स्कूल नूल या बॅनरखाली ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या माडीवर आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. याकामी तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री. जावडेकर व तालुक्याचे तहसीलदार श्री. नेनेसाहेब यांचे सहकार्य लाभले. याशिवाय एस.डी. हायस्कूल संकेश्वरचे मुख्याध्यापक श्री. व्हसमोट यांनी शिक्षण संस्थेची घटना तयार करण्यास मदत केली. आठवीचा वर्ग सुरू झाला.
‘इवलेसे रोप लाविले दारी- त्याचा वेल गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाने ही शाळा वाढत चालली. बसर्गे, हलकर्णी, येणेचवंडी, नौकूड, चन्नेकुप्पी, जरळी, मुगळी, खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, इदरगुच्ची, तनवडी, हणमंतवाडी, खमलेहट्टी, शिंदेवाडी, हिटणी आदी गावांहून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नूलला येऊ लागले. जागेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, तो प्रश्न संचालकांनीच निकालात काढला. काही दिवस पाटलांच्या वाड्यात आणि नंतर श्री रामनाथगिरी समाधीमठात ही शाळा स्थलांतरित झाली. बसर्गे येथील श्री. आबासाहेब चौगुले हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक. संस्था मुख्याध्यापक आणि समाज यांची चांगली नाळ बनविण्याचे काम आबासाहेबांनी केले. गेल्या 60 वर्षांत पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचले.
संस्थेचे कामकाज आणि शिक्षणाची तप्तरता पाहून नूल ग्रामपंचायतीने निलजी रस्त्याकडेला संस्थेसाठी सुमारे दहा एकर जागा दिली. या जागेवर संस्थेने आदर्शवत इमारत बांधली. त्यानंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, साखर कारखाना, सहकारी संस्था यांच्या आर्थिक योगदानातून दोन नंबरची इमारतीपाठोपाठ तीन नंबरची दुमजली इमारत उभी राहिली.
संस्थेला 1983 साली तंत्रशिक्षणासाठीची परवानगी मिळाली. 1987 साली दहावी बोर्ड परीक्षा केंद्र म्हणून 1990 साली तत्कालीन आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या सहकार्यातून ज्युनिअर कॉलेजची परवानगी तर 2011 साली सेमी इंग्रजीचे वर्ग, 2014 साली ई-लर्निंग तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम तर 2017 साली विज्ञान शाखेची परवानगी मिळाली.
हॉकीमध्ये तर या शाळेने राज्यस्तरावर आपली मजल मारली असून, अशाप्रकारे हॉकीमध्ये यशस्वी होणारी राज्यातील ती एकमेव शाळा असेल. यामुळे शाळेच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुराच आहे. दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या मातोश्री इंदिरादेवी यांचे हे गाव असल्याने डॉ. जाधव हे या गावाला कार्यक्रमप्रसंगी भेट देत असत. यावेळी शाळेच्या संचालक मंडळाने डॉ. जाधव यांची भेट घेऊन संस्थेला नवीन इमारत बांधून द्यावी, असा प्रस्ताव ठेवला. शाळेला व ज्युनिअर कॉलेजला मातोश्रींचे नाव देण्याचा ठराव केला. अवघ्या 10 महिन्यांतच शाळेची सुंदर अशी इमारत उभी केली. या नव्या सुसज्ज इमारतीमुळे या भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण शहरी दर्जाप्रमाणे घेता येणार असून, यामुळे या भागातील पालकांतून डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आभारच व्यक्त केले जात आहेत.
प्रवीण आजगेकर गडहिंग्लज.