Thu, Jul 18, 2019 16:37होमपेज › Kolhapur › ऊस पीक तांबेर्‍याच्या विळख्यात

ऊस पीक तांबेर्‍याच्या विळख्यात

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 12:49AMराधानगरी : वार्ताहर

संततधार पावसामुळे राधानगरी तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीमधील उभे ऊस पीक बर्‍याच  ठिकाणी जमीनदोस्त झाले असून धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊस पिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणवायचा? या यक्ष प्रश्‍नाने शेतकर्‍यांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.

उसावर तांबेरा हा रोग बुरशीमुळे होत असतो. ऊसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे टिपके पडतात. नंतर सदर टिपक्यांचा आकार वाढत जातो. उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. ऊस पिकाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी पाणेच खराब झाल्याने ऊस रोपांतील प्रकाश संश्‍लेषण प्रक्रिया खंडित होण्याच्या मार्गावर असते. याचा फटका ऊस धाटाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांना तांबेरा रोगाच्या सुलतानी संकटाने ग्रासले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण ऊस शेतीचा प्लॉट खराब झालेले पाहण्यास मिळत आहेत. तांबेरा रोगावर सध्य स्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात या विवंचनेत शेतकरी आहेत.

ऊस पिकावर नदी काटावरील तसेच डोंगराशेजारील शेतीमध्ये तांबेर्‍याचे प्रमाण अधिक आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित ऊस जाती, उसाच्या सरीतील अंतर कमी, युरिया खताचा अधिक वापर यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोग पडला आहे. सद्यस्थितीत तांबेरा कमी होण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणजे पावसाची उघडीप हाच आहे. तर कृत्रिम उपाय म्हणजे औषध फवारणी आहे. मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने औषध फवारणी कशी करायची हे मोठे आव्हान शेतकर्‍याच्या समोर उभा आहे. औषध फवारणीसाठी डायथेन, क्लीक्झिन अशा फवारण्या केल्यातर तांबेरा नियंत्रणात कांही प्रमाणात आणता येतो.