Fri, Jul 10, 2020 21:21होमपेज › Kolhapur › पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा संघर्ष समितीचा इशारा

पगारी पुजारी नेमण्याबाबत प्रसंगी वटहुकूम : पालकमंत्री

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:57AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक तांत्रिक अडचणीमुळे हिवाळी अधिवेशनात येणार नाही. अधिवेशन संपल्यानंतर याबाबत 15 दिवसांत वटहुकूम काढू, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्याची पूर्तता झाली नाही, तर अधिवेशनानंतर पुजारी हटावचे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. समितीच्या सदस्यांची शनिवारी बैठक झाली.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक या अधिवेशनात आणले जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. मात्र, त्याबाबत शासनाच्या वतीने काहीच निर्णय झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्याशी समिती सदस्यांनी फोनद्वारे चर्चा केली. अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याविषयीचे विधेयक तांत्रिक अडचणी निर्माण होत आल्याने वेळेअभावी या अधिवेशनात आणता आले नाही. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर शासनाच्या वतीने याबाबत वटहुकूम काढला जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

पगारी पुजारी नेमण्याची कार्यवाही अंबाबाई मंदिरापुरती करण्यात यावी, वटहूकुमाबाबत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करावी, ती न झाल्यास पुजारी हटावचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आर. के.पोवार, बाबा पार्टे, दिलीप पाटील, संजय पवार, विजय देवणे, प्रा. जयंत पाटील, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, वसंतराव मुळीक, शरद तांबट, विनायक फाळके आदी उपस्थित होते.