Thu, Jun 20, 2019 00:46होमपेज › Kolhapur › निर्बंध केवळ कागदावरच!

निर्बंध केवळ कागदावरच!

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:42PMचंदगड : नारायण गडकरी

धावत्या जगात झटपट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी मोबाईलचा वापर होऊ लागला; पण मोबाईल वापराचा मूळ हेतू बाजूलाच राहिला असून त्याचा दुरुपयोग अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. मोबाईल वापरासह ‘धूम’ स्टाईल दुचाकी मोटारसायकलींच्या कर्णकर्कश आवाजाने महाविद्यालय परिसराची शांतता बिघडत चालली आहे. याकडे महाविद्यालय प्रशासनाचे अधिकच दुर्लक्ष होत चालले आहे. 
शाळा व महाविद्यालयीन आवारात मोबाईल वापर व दुचाकी वाहनांच्या निर्बंधाचा सध्या फज्जा उडाला आहे. शिक्षक आणि विद्यार्थीवर्गातून मोबाईलचा वापर मुक्‍तपणे सुरू आहे. कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोबाईलच्या तालावर बिनधास्त वागणारी मंडळी शाळा व महाविद्यालयाच्या आवारात दिसत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत असल्याचे सुजाण पालकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. 

कॉलेज तरुण-तरुणींबरोबरच प्राध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकही यापूर्वी खुलेआम मोबाईलचा वापर करत होते. यामुळे एकंदर शिक्षणावर परिणाम होत असल्यामुळे शासनाने यावर निर्बंध लादले. यापुढे शाळा व महाविद्यालयीन आवारात मोबाईल वापरणार्‍यांवर करडी नजर राहील व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होण्याऐवजी दुर्लक्षच झाल्याचे व हा वापर आणखी वाढला असल्याचे निदर्शनास येत आहे. विविध कंपन्यांचे मोबाईल, रिंगटोन्स व कॉलरट्युन्स आणि एमपीथ्री मोबाईल्समधील गाण्यांच्या तालात गोंधळ घालणारी युवा पिढी चंदगड तालुक्यातील कॉलेज आवारात दिसून येत आहे. 

कॉलेज प्रशासनानेही नियमात शिथिलता आणल्यामुळे सदान्कदा मोबाईल गेममध्ये गर्क राहणार्‍यांची संख्याही वाढली आहे. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षकांच्या बरोबरीने आता आठवी ते दहावी गटातील मुलेही मोबाईल घेऊन शाळेला जात आहेत. एक वेळ गृहपाठाची वही घरी राहिली तरी चालेल; पण मोबाईल हवाच, अशी स्थिती आहे. कधीही संपर्क साधता येतो, त्यामुळे काळजी वाटत नाही या सबबीखाली मुलांना मोबाईल देणार्‍या पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नको त्या गोष्टी व्हायरल

मोबाईलमधील ब्लू-टूथमुळे एकाकडून दुसर्‍याकडे झटक्यात कोणतेही व्हिडीओ चित्रीकरण पाठवता येते.  फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप व हाईक उघडून बसणे तसेच अलीकडे तर सर्रास कॉलेजकुमारांकडे अश्‍लील चित्रफिती मोबाईलमध्ये आढळून येत असल्याचेे अनेक प्रकार समोर येत असल्याने शिक्षक व पालक हबकले आहेत. वाईट संस्काराची शिदोरी घेऊन आजचा भावी विद्यार्थी आपले आयुष्य घडवील का, या चिंतेत पालकवर्ग आहेत.